कोरोना टेस्ट ‘निगेटिव्ह’; कांदा लिलाव ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:05 AM2021-05-27T01:05:49+5:302021-05-27T01:06:21+5:30
सिन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदूरशिंगोटे व दोडी या कांदा लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या दोन्ही उपबाजारातही लवकरच कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे.
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदूरशिंगोटे व दोडी या कांदा लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या दोन्ही उपबाजारातही लवकरच कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे.
बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारपासून कांदा व शेतमालाच्या लिलावास प्रारंभ झाला. कोरोना नियमांची अंमलबजावणी करीत व्यापारी, शेतकरी व कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जात होता. मंगळवारी १५० जणांची कोरोना रॅपिड टेस्ट
करण्यात आली.
तर बुधवारी ५० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वजण निगेटिव्ह आल्याने व्यवहार सुरळीत झाले. बुधवारी सिन्नरच्या मुख्य आवारात २१०० क्विंटल कांदा आवक झाली होती. कमाल भाव १६०० तर सरासरी भाव १४०० रुपये राहिला. नायगाव उपबाजारातही ५७ वाहनांतून ७१० क्विंटल कांद्याची आवक झाली. नायगाव येथे कमाल भाव १७५० तर किमान भाव १४५० राहिला.
नांदूर व दोडी उपबाजार सुुरु होणार
सिन्नर व नायगाव उपबाजार सुरळीत झाल्यानंतर नांदूरशिंगोटे व दोडी उपबाजार सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव विजय विखे यांनी दिली. नांदूरशिंगोटे उपबाजार शुक्रवार (दि. २८) रोजी तर दोडी उपबाजार बुधवार (दि. २ जून) रोजी सुरु होणार आहे. उपबाजारात प्रवेश करणाऱ्यांना रॅपिड टेस्ट बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता. याशिवाय मास्क, सामाजिक अंतर पाळणे आणि कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सचिव विजय विखे यांनी सांगितले.