बागलाणच्या आदिवासी भागात कोरोना चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:44+5:302021-05-13T04:14:44+5:30
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली असून, ठिकठिकाणी कोरोना संशयितांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. ...
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली असून, ठिकठिकाणी कोरोना संशयितांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पहिल्या दिवशी ११७ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सहा रुग्ण बाधित आढळून आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी संगितले. बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यासह पूर्व भागातील आदिवासी वस्तीत राहणारे रहिवासी गैरसमजामुळे कोरोना चाचणी तसेच लस घेण्यास विरोध करत आहेत. प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे हा परिसर कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. त्यावर उपाययोजना म्हणून तातडीने समाजप्रबोधन करून कोरोना चाचणीसोबतच लसीकरण करण्याच्या सूचना आमदार बोरसे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. याची दखल घेत चार पथकांनी केळझर, गव्हानेपाडा, साल्हेर, पठावे येथे चाचणीबाबत समाजप्रबोधन केले. त्यानंतर नागरिकांकडून पथकाला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-------------
पहिल्या दिवसाच्या चाचणीत केळझर, गव्हानेपाडा येथे ४५ संशयितांची चाचणी घेण्यात आली. त्यात तीनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. पठावे परिसरातील ३९ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात एकजण बाधित आढळला. साल्हेर येथे पाचजणांची चाचणी घेतली असता, त्यात दोघे बाधित आढळले. मुल्हेर येथे २७ संशयितांची चाचणी घेतली. मात्र, या चाचणीत एकही बाधित रुग्ण आढळला नाही.