नांदगावी व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:36+5:302021-05-11T04:14:36+5:30

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई ...

Corona testing mandatory for Nandgaon professionals | नांदगावी व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

नांदगावी व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

Next

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. येवला विभागीय अधिकारी यांनी नांदगाव येथे घेतलेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर केले नाही तर त्यांना व्यवसाय करता येणार नाही. ज्याचे आरटीपीसीआर निगेटिव्ह असेल त्यांनी पत्र सोबत बाळगावे. ॲन्टिजन रॅपिड टेस्ट अहवाल गृहीत धरली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------------------------------------

हिसवळ खुर्दला लसींचा तुटवडा

नांदगाव तालुका : हिसवळ खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडची लस तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपसरपंच संजय आहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे .

हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणाचा सहा हजारांचा टप्पा पार झाला आहे. या आरोग्य केंद्रात ३८ गावे समाविष्ट असून, सुमारे ६५ हजार लोकसंख्या लसीकरणापासून वंचित आहे. आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सात उपकेंद्रे आहेत. अनेक भागात लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. मात्र शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. केवळ शंभर-दोनशे लसीचे डोस एकावेळेस उपलब्ध होतात. तेही दोन-दोन, तीन -तीन दिवसाआड. त्यात नांदगाव, मनमाड येथील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेत आहेत.

दोन्ही शहरांमध्ये लसीकरणाची सुविधा असतानाही नागरिक येथे येतात. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पुरेसी लस उपलब्ध न झाल्यामुळे कर्मचारी वर्गाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पंचक्रोशीतून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण या ठिकाणी पायपीट करावी लागते.

जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे उर्वरित १५ ते २०दिवस अतिशय महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त लस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल. लसीकरण करून घेणे प्रशासनालाही सोपे जाईल. त्यामुळे त्वरित लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी आहेर यांनी केली आहे .

----------------------------------------------------------

गर्दी नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची

नांदगाव : आरोग्य विभागाकडून आक्षेप, टोलवाटोलवीने गुंतागूंत

नांदगाव : येथील जैन धर्मशाळेत गेल्या शनिवारी (दि.८) लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमुळे कोविड-१९ च्या नियमांचा पुरता बोजवारा उडाला होता. त्याची जबाबदारी आरोग्य विभागाची नसून स्थानिक प्रशासनाची असल्याचा आक्षेप तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी घेतला असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

शनिवारी तहसीलदार यांनी गर्दीची जबाबदारी झटकत देशात असेच चालले आहे, मी तरी काय करणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कमी पुरवठ्यामुळे आपला नंबर केव्हा लागतो या आशंकेने धास्तावलेले नागरिक सरकारी बाबूंच्या, चेंडू फळीच्या खेळात वाऱ्यावर सोडले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. ससाणे यांनी इतर यंत्रणांनी सहकार्य करावे, अशी भूमिका आता घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोविड-१९ लसीकरण सत्राच्या ठिकाणी होणारी गर्दी हा एक गंभीर रूप धारण करणारा मुद्दा होऊन बसला आहे. लस देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असली तरी लस घेणाऱ्या लाभार्थींच्या गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी स्थानिय प्रशासनाने स्वीकारली तर गर्दीचे नियोजन होऊ शकते. नगर परिषद प्रशासनाने २०० टोकन नंबर वितरित करून तेवढेच लोक लसीकरणाला हजर राहतील याचे नियोजन करावे. कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देऊन गर्दीचे नियोजन करावे. इतर खात्यातील अधिकारी/कर्मचारी वर्गावर याची जबाबदारी द्यावी. पोलीस प्रशासनाची आवश्यक तेथे मदत घ्यावी. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या भागातच आपले लसीकरण करून घ्यावे. ऑनलाइन रजिस्टेशन करूनच लसीकरण सत्रात यावे या व इतर सूचनांचे जनतेने अनुपालन केले तर शांततेत लसीकरण पार पाडण्यात सहकार्य होईल व हे सहकार्य जनतेकडून अपेक्षित आहे, असे डॉ. अशोक ससाणे यांनी स्पष्ट केलेे.

इन्फो

अनेक जण लसविना माघारी

लसीकरणाच्या दिवशी केंद्रात नागरिकांची व रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती. आरोग्य कर्मचारी लस घेऊन तब्बल दीड तास उशिराने दाखल झाले. ते ही लसीचे फक्त ७० डोस घेऊन आले. या प्रकारामुळे नागरिकांना विनालस घरी जावे लागले. या घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Corona testing mandatory for Nandgaon professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.