अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापनांच्या मालक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:22+5:302021-04-22T04:14:22+5:30
सिन्नर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सिन्नर शहरातील अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापनांचे मालक आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी ...
सिन्नर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सिन्नर शहरातील अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापनांचे मालक आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय सिन्नरच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी तीन दिवस सिन्नर तहसीलजवळील प्रशासकीय इमारतीत आस्थापनानुसार नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २०) शहरातील सर्व मेडिकल चालक, मालक आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी (दि. २२) शहरातील सर्व किराणा व्यावसायिक, किराणा साहित्य संबंधित सर्व आस्थापनांचे मालक आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २३) इतर आवश्यक सेवेतील आस्थापनांच्या मालक आणि कर्मचाऱ्यांची चाचणी होईल. चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाचे प्रमाणपत्र असलेल्या व्यावसायिकांनाच व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापनांचे मालक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. तसे करण्याचे नियोजन महसूल, तालुका आरोग्य, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे. नियोजन केलेल्या दिवशी त्या-त्या आस्थापनातील मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आदींनी केले आहे.