कोरोना उपचाराचं भरमसाठ बिल, नाशिकमध्ये रुग्णालयाबाहेर अंगावरील कपडे काढून अनोखं आंदोलन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:27 PM2021-05-25T20:27:19+5:302021-05-25T20:39:09+5:30

नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला.

Corona treatment bill unique agitation by aap leader outside the hospital in Nashik Video goes viral | कोरोना उपचाराचं भरमसाठ बिल, नाशिकमध्ये रुग्णालयाबाहेर अंगावरील कपडे काढून अनोखं आंदोलन; Video व्हायरल

कोरोना उपचाराचं भरमसाठ बिल, नाशिकमध्ये रुग्णालयाबाहेर अंगावरील कपडे काढून अनोखं आंदोलन; Video व्हायरल

googlenewsNext

- अझहर शेख 

कोरोना संकटात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकार अजूनही काही थांबताना दिसत नाहीत. खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली जात असल्याने नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला. या गांधीगिरीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये खासगी रुग्णालयांच्या अमानवी वागणुकीविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. पोलिसांनी भावे यांना गेल्या तीन तासांपासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं असून त्यांच्यावर अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानं पोलीस ठाण्याबाहेर खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात संतप्त नागरिकांनी गर्दी केली आहे. 

नेमकं काय घडलं?
नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात एका कुटुंबातील पाच सदस्यांवर कोरोनावरील उपचार सुरू होते. यातील चार सदस्य उपचारादरम्यान दगावले आहेत. तर एक सदस्य कोरोनावर मात करुन घरी परतला. रुग्णालयानं आकारलेलं जवळपास साडेचार लाखांचं बिल देखील कुटुंबातील सदस्यानं रुग्णालयाला अदा केलं होतं. पण रुग्णालयानं रुग्ण दाखल होताना डिपॉझिट म्हणून घेतलेले दीड लाख रुपये परत दिलेले नाहीत. संबंधित कुटुंबातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात खेटा घालत होते. तरीही रुग्णालय प्रशासनानं डिपॉझिट परत दिलेलं नाही. याच मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णालायत धडक देऊन आंदोलन केलं. 

नाशिकमध्ये आम आदमी पक्षाकडून कोरोना काळात खासगी रुग्णालयांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी कारभाराची पोलखोल करण्यासाठी 'ऑपरेशन हॉस्पीटल चळवळ' नावाची मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आम आदमी पक्षाकडून खासगी रुग्णालयांचे मनमानी कारभार फेसबुक लाइव्हद्वारे उघडकीस आणले जातात. याच मोहिमेत आज जितेंद्र भावे यांनी रुग्णालय डिपॉझिटचे पैसे रुग्णाला परत करत नसल्यामुळे 'आमचे कपडे घ्या, पण पैसे परत करा' अशी भूमिका घेत अनोखं आंदोलन केलं. 
 

Web Title: Corona treatment bill unique agitation by aap leader outside the hospital in Nashik Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.