कोरोनाने काजवा महोत्सवावर फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:36+5:302021-05-23T04:14:36+5:30
नाशिक : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मे महिन्याच्या अखेरीस काजव्यांची चमचम पहावयास मिळते. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली काजवा महोत्सव ...
नाशिक : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मे महिन्याच्या अखेरीस काजव्यांची चमचम पहावयास मिळते. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली काजवा महोत्सव सापडला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता नाशिक वन्यजीव विभागाने लेखी आदेश काढत काजवा महोत्सव रद्द केला आहे.
नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभ्यारण्यातील भंडारदरा वनपरिक्षेत्रातील विविध गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर काजव्यांची चमचम अनुभवयास येते. वळव्याच्या पावसानंतर अभयारण्यात जणू तारकादळे जमिनीवर आल्याचा भास होतो. दरवर्षी नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगरसह परराज्यांतूनही पर्यटक हा निसर्गाचा आविष्कार बघण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र मागील वर्षापासून यास कोरोनामुळे ‘ब्रेक’ लागला आहे.
काजव्यांचा प्रजननकाळ येथील स्थानिक आदिवासींना मोठा रोजगार देणारा ठरत असतो. मात्र मागील वर्षांपासून हा रोजगार कोरोनाने गिळंकृत केला आहे. यावर्षीही चित्र फारसे वेगळे नाही. कोरोनाचा धोका यंदाही असल्याने रोजगार बुडाला तरी चालेलल मात्र काजवा महोत्सवाद्वारे कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही, असा निर्णय या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या गावकऱ्यांनी घेतला आहे. नाशिक वन्यजीव विभागानेदेखील मागील दोन महिन्यांपासून अभयारण्याची वाट पर्यटकांसाठी बंदच ठेवली आहे.
----इन्फो----
गावकऱ्यांची सजगता हेच सुरक्षाकवच
शाश्वत पर्यटनासोबतच या भागात अत्यल्प रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. शेतीवर अवलंबून असणाऱ्या येथील अनेक आदिवासी गावे-पाडे, वाड्या-वस्ती यांना पर्यटनाद्वारे निवास-न्याहारीची सोय, वाटाड्या (गाइड), जंगल भ्रमंती यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होते; परंतु सलग दोन वर्षे पर्यटन बंद असल्याने येथील स्थानिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. परिणामी बेरोजगारी सोबतच उपासमारीचे संकट ओढावू लागले आहे. शासनाने या भागात विशेष लक्ष देऊन आवश्यक ती मदत द्यायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या परिसरातील आदिवासी ग्रामस्थांनी कोरोनाच्या संसर्गकाळात दाखवलेली सजगता ही कौतुकास्पद आहे.
-----कोट------
अभयारण्य पर्यटकांसाठी एप्रिलपासून बंदच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र कहर केला आहे. यामुळे शासनाच्या नियमानुसार नाशिक वन्यजीव विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांनी पत्राद्वारे काजवा महोत्सवदेखील रद्द करण्यात आल्याचे कळविले असून, त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले जाणार आहे. याबाबत सर्व ग्राम परस्थितीकीय विकास समित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमोल आडे, वनक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग, भंडारदरा
केाट..
ग्रीष्म ऋतू संपताच काजवे चमकण्यास सुरुवात होते. काजव्यांची चमचम निसर्गप्रेमींना अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा काजवा महोत्सव रद्द करण्याचा स्तुत्य निर्णय येथील ग्रामस्थ आणि वनविभागाने घेतला आहे. यामुळे या परिसरात कोणत्याही पर्यटकांनी निर्बंध मोडून येऊ नये.
- रवी ठोंबाडे, अध्यक्ष, भंडारदरा टुरिझम संस्था
-
फोटो आर फेाटोवर २२ काजवा महोत्सव