मालेगावी जानेवारीत होणार कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:01+5:302020-12-16T04:31:01+5:30
मालेगाव : संपूर्ण राज्यात ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरून लक्ष वेधून घेणाऱ्या मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आता कोरोनाच्या लसीकरणाची ...
मालेगाव : संपूर्ण राज्यात ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरून लक्ष वेधून घेणाऱ्या मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आता कोरोनाच्या लसीकरणाची जोरदार तयारी सुरू असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दररोज येणाऱ्या मार्गदर्शक सूचना आणि माहिती याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मनपा आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.
पुढील वर्षात जानेवारी महिन्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक लसींचे शहरातील नागरिकांना लसीकरणास करण्यात येणार आहेत. त्यात प्रथम आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, खासगी रुग्णालये, आरोग्य केंद्र यांच्या आस्थापनांकडून नावे मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाकडून ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचे आहे त्यांची नोंद रजिस्टरमध्ये भरून ‘डाटाबेस’ करून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात येणार आहे. त्यात साधारणपणे ६६ खासगी हॉस्पिटल आणि २३ शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मालेगाव शहरातील १४ नागरी आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसी साठविण्यात येणार असून त्याकरिता शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगावात ‘सेंट्रल स्टोअर’ मध्ये लसींचे एकत्रिकरण करण्यात येईल.
इन्फो
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य
कोरोनाच्या लसीकरणात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांचे लसीकरण केले जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक अतिजोखमीचे आणि ५० वर्ष वयापुढील मधुमेह, कॅन्सर आणि लिव्हरचे आजार असणाऱ्या व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
इन्फो
‘आधार-पॅन’ हवाच!
मालेगाव शहरातील ज्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण करायचे आहे अशा व्यक्तीला स्वत:चे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो आणावे लागेल. त्याची पडताळणी झाल्यानंतर आरोग्य विभागातर्फे लसीकरण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल. लस घेतल्यानंतर त्या-त्या व्यक्तींना अर्धा तास तेथेच थांबावे लागेल. अर्धा तासात ज्या व्यक्तीचे लसीकरण झाले आहे, त्याला काय त्रास होतो याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याला घरी जाऊ देण्यात येईल. ज्या व्यक्तीचे प्रथम लसीकरण झाले, त्या व्यक्तीला पुन्हा २८ दिवसांनी आणखी एक लस घ्यावी लागणार आहे.
इन्फो
प्रारंभिक प्रशिक्षण देणार
मालेगावात कोरोना लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्य स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी ५ जणांची टीम असणार आहे. त्यात एक डॉक्टर दिला जाईल. कोअर कमिटी स्थापन केली जाणार असून, दर आठवड्याला समितीच्या बैठका होऊन चर्चा केली जाईल. कोरोना लसीकरण केल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास कोअर समिती त्यावर मार्ग काढून मार्गदर्शन करेल. शहरातील वाडिया हॉस्पिटल, सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय आणि अली अकबर रुग्णालय अशा चार ठिकाणी ही समिती असेल. त्यामुळे शासकीय स्तरावरून रोजच बैठका होत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे शहरात सर्वांनाच लसीकरणाची उत्सुकता असून, कोणती लस दिली जाते, याकडे लक्ष लागून आहे.
कोट....
कोरोनाच्या लसीकरणासाठी ८९६ खासगी कर्मचारी, १५० आशा वर्कर, ४०० अंगणवाडी कर्मचारी आणि ९०० इतर कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. डाटा बेस गेल्यानंतर नावानिशी प्रत्येक व्यक्तींची शासन दरबारी नोंद होईल.
- डॉ. सपना ठाकरे, आरोग्य अधिकारी, मालेगाव मनपा
===Photopath===
151220\15nsk_16_15122020_13.jpg
===Caption===
प्रतिक्रियेसाठी फोटो - डॉ. सपना ठाकरे, आरोग्य अधिकारी, मालेगाव मनपा