कोरोना बळी २५०० वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:26+5:302021-04-07T04:15:26+5:30
नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० ...
नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० बळींचा टप्पा पार केला आहे. अखेरच्या ५०० बळींपैकी निम्म्याहून अधिक बळी हे केवळ १५ दिवसांतील असल्याने चिंतेच्या सावटात अधिकच भर पडली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संख्येपेक्षाही बळींचे वाढते प्रमाण जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अधिक घातक ठरू लागले आहे. किंबहुना कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्याच्या बाहेर जात असली तरी किमान बळींवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. तरीदेखील दिवसाला साधारणपणे २० ते २५ बळी जाऊ लागल्याने कोरोनाचा मृत्युदरदेखील वाढू लागला आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच सर्वाधिक बळींच्या प्रमाणातही नाशिक जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये दिसू लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्च रोजी आढळला होता. मात्र त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर गेलेला पहिला बळी हा जिल्ह्यातील कोरोना बळीचा प्रारंभ होता. त्यानंतर कोरोनाचा वेग हळूहळू वाढत गेला, तशी बळींची संख्यादेखील वेगाने वाढू लागली.
इन्फो
प्रारंभीचे ५०० बळी चार महिन्यांत
कोरोना बळींना प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात त्याचा वेग अगदी अत्यल्प होता. ५० बळी जाण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागला होता. मात्र त्यानंतर १ ऑगस्टला सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत प्रारंभीच्या पाचशे बळींचा टप्पा कोरोनाने पूर्ण केला होता. त्यानंतरचा दुसरा बळींचा टप्पा पूर्ण करण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागला होता. १० सप्टेंबरला जिल्ह्यात कोरोना बळीने १ हजार आकडा गाठला होता.
इन्फो
सर्वाधिक वेगवान महिनाभरात ५०० बळी
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वेगवान ५०० बळींचा टप्पा हा सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला होता. १० सप्टेंबरला हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर दीड हजारावा बळी हा बरोबर एक महिन्याने १० ऑक्टोबरला गेला होता. म्हणजे अवघ्या महिनाभरात कोरोनाने हे थैमान घातले होते.
इन्फो
दिवाळीनंतर वेग मंदावला
ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा आणि बळींचा वेगदेखील कमी होऊ लागल्याने त्यानंतरच्या पाचशे बळींचा टप्पा हा तीन महिन्यांनी म्हणजेच ७ जानेवारीला पूर्ण झाला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात पुढील ५०० बळींचा अर्थात एकूण अडीच हजार बळींचा टप्पा पार झाल्याने प्रशासन प्रचंड चिंतेत पडले आहे.
-----‐---------
ही ग्राफ स्टोरी आहे. ग्राफसाठी ईश्वरला आकडे दिलेले आहेत.