कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:15 IST2022-03-30T19:13:48+5:302022-03-30T19:15:25+5:30
नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून ...

कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी
नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील १२ नागरिकांपैकी १ नागरिक एकदा तरी बाधित झाल्याची अधिकृत नोंद आहे. तर कोरोनाचा पहिला बळी नाशिक जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० या दिवशी गेला. तेव्हापासून आतापर्यंतच्या २ वर्षांच्या कालावधीत ८ हजार ९०० बळींची अधिकृत नोंद झाली आहे. तरी अनधिकृत किंवा जे भीतीपोटी किंवा रुग्णालयेच उपलब्ध नसल्याने बळी गेलेल्यांच्या संख्येबाबत तर अद्यापही संभ्रम कायम आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार २ रुग्ण बाधित, तर ४ लाख ६७ हजार ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्या तारखेला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला, त्याच्या एक दिवस अगोदर अर्थात २८ मार्चला जिल्ह्यात आता कोरोना उपचारार्थी संख्या अवघी १५, तर प्रलंबित अहवालांची संख्या केवळ ६६ आहे. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण ३ भागात केल्यास पहिले ३ हजार बळी होण्यासाठी ३७५ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराहून अधिक कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे ३ हजार बळी अवघ्या ५४ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत गेले आहेत. नाशिकसाठी मार्च २०२१, एप्रिल आणि मे २०२१ हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, त्याच काळादरम्यान गेलेले शेकडो बळी पोर्टलवर अपलोडच केले गेले नसल्याने जून महिन्यात जेव्हा त्यांची नोंदणी झाली, त्यानंतर ५ ते ८ हजार बळींचा टप्पा जूनच्या अवघ्या २ आठवड्यात पूर्ण झाला होता.
सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये
जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ आणि मे २०२१ या महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे बळी ४३०४, नाशिक मनपा क्षेत्रात ४१०५, मालेगाव मनपा क्षेत्रात ३६४, तर जिल्हाबाह्य १२६ जणांचा बळी गेला आहे.