वधू-वर पालकांना धडकी! लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या; आता शंभरात कोणाला बोलावणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 01:00 PM2021-12-30T13:00:14+5:302021-12-30T13:01:56+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होत असताना, आता कुठे तरी लग्न सोहळे दणक्यात होतील, असे वाटत असताना, ओमायक्रॉनचे संकट पुढे आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध वाढविण्याचे संकेत आहेत. गेल्या महिन्यात असलेले निर्बंध सध्या कायम असले, तरी जानेवारीत निर्बंध अधिक वाढवले जातील, अशा चर्चांमुळे ज्यांच्या कुटुंबात लग्ने होणार आहेत, असे सर्वचजण अडचणीत आले आहेत. विशेषत: बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर आणि खुल्या ठिकाणी दोनशे वऱ्हाडींना परवानगी असली, तरी निमंत्रण पत्रिका अगोदरच वाटून ठेवलेल्या. त्यातच एका कुटुंबातील दोन व्यक्तींना बोलावले आणि प्रत्यक्षात चार व्यक्ती आल्या, तर त्यांना रोखता येणार आहे काय? असा प्रश्न आहे.
जानेवारीत सात मुहूर्त
जानेवारी महिन्यात ४, ६, २०, २२, २३, २७ आणि २९ असे सात विवाह मुहूर्त आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बुकिंग सुरू असताना, वऱ्हाडी किती बोलवावे, असा प्रश्न आहे. समजा आता दोनशे वऱ्हाडींसाठी बुकिंग केेेले आणि नंतर मर्यादा ५० वऱ्हाडींची आली, तर काय करायचे, असाही प्रश्न आहे.
मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्या
- मंगल कार्यालयचालकांना आरोग्य नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षिततेचे पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांची कामे वाढली आहेत.
- येणाऱ्या वऱ्हाडींना प्रवेशव्दारात अडवता येत नाही, तसेच अनेकांना सांगूनही मास्क लावला जात नाही आणि संबंधितांना अडवणेदेखील शक्य होत नाही. कारवाई मात्र मंगल कार्यालयांवर होते.
खुल्या जागेतही दोनशेच वऱ्हाडी
- शासनाच्या नियमावलीनुसार खुल्या जागेत दाेनशे वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येते.
- केवळ मंगल कार्यालयांना नियम, अन्य सोहळे आणि राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना संख्येचे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न केला जात आहे.
बंदिस्त सभागृहात शंभरपेक्षा जास्त नको...
नाशिक शहरात अद्याप नवीन नियमावली लागू नसून सध्या नोव्हेंबर महिन्यातील नियमावलीच लागू आहे. त्यामुळे खुली जागा म्हणजे लॉन्ससारख्या ठिकाणी दोनशे तर बंदिस्त मंगल कार्यालयात शंभर नागरिकांनाच परवानगी आहे. मात्र, त्यामुळेच अडचणी येत आहेत.
वधू-वर पित्यांना धडकी...
मुलीचे लग्न आहे. मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित केल्याने लग्नाला कोणा-कोणाला बोलवावे याबाबत अडचण होत आहे. लग्न सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका दिल्यानंतर संबंधित कुटुंबातील किती सदस्य येतील हे सांगता येत नाही आणि आले तर अडवता येत नाही, त्यामुळे काय करावे, हा मोठा प्रश्न आहे.
- संजय उगले, वधूपिता
मुलाच्या लग्नाला सर्वच आप्तेष्टांना बोलवायचे तर अडचण होते, पत्रिका नाही दिली तर नाराजी होते, परंतु नियमांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे मर्यादित संख्येतच लग्न उरकावे लागणार आहे.
वसंत कुलकर्णी, वरपिता, इंदिरानगर