CoronaVirus News : नाशिककरांनाे सावधान! कोरोनावाढीचा वेग चौपट; प्रशासनाची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:03 PM2022-01-06T15:03:43+5:302022-01-06T15:18:36+5:30
नाशिक : नाशिकमध्ये देखील काेरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठ दिवसांत चौपट ...
नाशिक : नाशिकमध्ये देखील काेरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठ दिवसांत चौपट रुग्ण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली तरी नागरिकांनी देखील सावधानता बाळगणे अपेक्षित असून कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
कोरोनाचे संकट कमी झाले आणि नव्या वर्षात कोरोनाचे प्रमाण आणखी कमी होईल, असे वाटत असतानाच नव्या वर्षासोबतच कोरोनाची तिसरी लाट देखील आली आहे. दिवसेंदिवस रूग्ण अधिकाधिक आढळून येत असल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नाशिकरांना काळजी घेण्याबाबत आवाहन करतांना त्यांनी नियमांचे पालन करण्याची स्वयंशिस्त नाशिककरांनी पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गेल्या आठ दिवसात कोरेाना रूग्णवाढीचा वेग चौपटीने असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे अपेक्षित असून प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करणे आपल्या हातात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे नाशिक शेजारील जिल्ह्यात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आपल्याकडे निर्बंध लागू नये या दृष्टीने नाशिककरांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.
कोरोनाची तिसरी लाट जगभरात असल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे आपणालाही कोरोना रूग्णांची आकडेवारी माहीत असल्याने त्यादृष्टीने स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी लसीकरण हेच एकमेव प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध झाल्याने ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे अावाहनही मांढरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सुमारे ६ लाख नागरिकांचा अजूनही दुसरा डोस झालेला नाही. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा आणि कमीत कमी उपचारात बरे व्हावे असे वाटत असेल तर लसीकरण महत्वाचे आहे. लसीकरणाबाबतचे सर्व गैरसमज आपण दूर केलेले आहेत. त्यामुळे कोणतीही शंका न ठेवता लसीकरण करावे असे देखील आवाहन करण्यात आहे.