CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाक्यांमध्ये ठणठणाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:30 PM2022-01-06T14:30:39+5:302022-01-06T14:43:25+5:30
नाशिक - गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बळी गेला होता. मात्र, आता ...
नाशिक - गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बळी गेला होता. मात्र, आता शहरात कोरोना वाढीचा दर प्रचंड वेगाने वाढत असताना, दुसरीकडे याच रुग्णालयातील ऑक्सिजनच्या पाचही टाक्यांमध्ये सध्या ठणठणाट आहे.
त्याच प्रवेशद्वाराशी काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून आता ऑक्सिजनचे टँकर आले तरी, ते भरणेच शक्य होणार नाही. त्यामुळे एकंदरच महापालिकेच्या नियोजनावर शंका घेतली जात आहे. प्रशासनाने त्याबाबत सारवासारव केली असून, दोन ठेकेदारांकडून स्पर्धात्मक दर मिळाल्यानंतर लगेचच या टाक्या भरल्या जातील, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून वेगाने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेने देखील शहरात खासगी आणि निमशासकीय रुग्णालये मिळून आठ हजार खाटांची व्यवस्था केली आहे. गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाई मेाठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे अनेकांचे बळी गेले. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पाच पट रुग्णसंख्या वाढेल आणि ऑक्सिजनची गरज देखील त्याचप्रमाणात भासेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार नाशिक शहरातच जवळपास १३ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पाच टाक्या असून त्यातील १३ केएल आणि ३ केएलची टाकी अगोदरच बसवण्यात आली. आता एकूण पाच टाक्या मिळून १ लाख ६ हजार लिटर्सची क्षमता असलेल्या या टाक्या असून, याचठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट देखील उभारण्यात आला आहे. विशेषत: गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात याच रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली आणि पर्यायी ऑक्सिजन पुरवठ्याची सोय नसल्याने २२ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे आता टाक्या बसवल्या, परंतु कोरोना वेगाने वाढत असताना त्या भरलेल्या मात्र नाहीत.
याचठिकाणी सध्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू झाली आहेत. अशा प्रकारचे काँक्रिटीकरण सुरू केल्याने त्याच्या क्युरिंगसाठी पंधरा दिवस वेळ लागणार असून अशावेळी टाक्यांपर्यंंत टँकरच पोहोचू शकणार नाही. त्यामुळे टाक्या भरणार कशा, असा प्रश्न केला जात आहे.
अगोदरच्या टाक्यांच्या कामाच्या वेळी शिल्लक असलेले काँक्रिटीकरणाचे काम केले जात असले तरी, त्यामुळे टाक्या भरण्यास अडथळा होणार नाही. टँकर जातील एवढा रस्ता उपलब्ध आहे.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा