लॉकडाऊन काळात जोखीम पत्करून काम करणारे कोरोना योद्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:14 PM2021-03-24T17:14:17+5:302021-03-24T18:31:58+5:30
नाशिक- काेरोनाचे संकट तसे आकस्मिकच आले. परंतु या काळात अधिकारी आणि अधिकार यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. नाशिकच्या विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांपासून पोलीस आयुक्त ते जिल्हा शल्य चिकित्सक अशी साऱ्यांचीच भूमिका गेल्या वर्षभरात महत्त्वाची राहिली. लॉकडाऊनची वर्षपूर्वी होत असताना या अधिकाऱ्यांनी कोरोना काळात बजावलेली भूमिका ही संसर्ग नियंत्रणात आणण्यात कारणीभूत ठरली.
नाशिक- काेरोनाचे संकट तसे आकस्मिकच आले. परंतु या काळात अधिकारी आणि अधिकार यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. नाशिकच्या विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांपासून पोलीस आयुक्त ते जिल्हा शल्य चिकित्सक अशी साऱ्यांचीच भूमिका गेल्या वर्षभरात महत्त्वाची राहिली. लॉकडाऊनची वर्षपूर्वी होत असताना या अधिकाऱ्यांनी कोरोना काळात बजावलेली भूमिका ही संसर्ग नियंत्रणात आणण्यात कारणीभूत ठरली. विभागीय आयुक्त राजाराम माने आणि नंतर राधाकृष्ण गमे तर आजी माजी पोलीस आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी देखील जीवाचे रान केले.
नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूरज मांढरे काम बघत असतानाच काेरोनाचे संकट आले आणि साथ रोग प्रतिबंधक कायद्याची प्रथमच अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यातील अनेक तरतुदी अनेकांना ज्ञातही नव्हत्या. परंतु त्यांनी मालेगावसाठी घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. अशाच प्रकारे शहरात देखील तत्कालीन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडेही कोरोना संसर्ग राेखण्याचे मोठे आव्हान आले हेाते. पहिला रूग्ण आढळल्यानंतर सुरूवातीला नाशिक शहरात कोरोना संसर्ग राेखण्यात त्यांनी यश मिळवले. नंतर मात्र आंतरजिल्हा सीमा खुल्या झाल्या आणि त्याचा फटका नाशिककरांना बसला. सप्टेंबरपर्यंत नाशिकमध्ये उच्चांकी संख्या असताना त्यांनी कोरोना चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देताना त्यांनी तयार केलेले महाकवच ॲप सर्वात उपयुक्त ठरले. देशपातळीवर त्याची दखल घेतली गेली. परंतु त्यांची मध्येच बदली झाली आणि नंतर विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. राजाराम माने यांच्या काळात उत्तर महाराष्ट्राच्या आढाव्याचे समन्वयाचे मोठे त्यांनी काम केले आणि नंतर गमे यांनी अपेक्षेप्रमाणेच त्यांच्या कामाला वेग दाखवून दिला आहे.
गमे यांच्या बदलीनंतर महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेल्या कैलास जाधव यांनी देखील आता शहरातील संभाव्य दुसरी लाट रोखण्याची तयारी केली असून ते स्वत:च रस्त्यावर दिसत आहेत.
कोरोना लॉकडाऊन काळात कायदा सुव्यवस्थाच नव्हे तर आरोग्य नियमांचे पालन करण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलावर होती. नाशिक शहरात विश्वास नांगरे पाटील तर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सुरुवातीला ही भूमिका बजावली. डॉ. आरती सिंग यांनी महिला अधिकारी असून मालेगाव सारख्या संवेदनशील भागात नागरिकांना समजावून कायदा पालनास भाग पाडले. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक समीर कडासने यांनी त्यांंच्या पूर्वानुभवाचा लाभ देत मालेगाव येथे जाऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण केले.
नाशिक शहरात विश्वास नांगरे पाटील यांच्या सारख्या अधिकाऱ्याने लॉकडाऊनचा कठीण काळ सांभाळला. तर त्यांच्या नंतर दीपक पांडेय यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोना संसर्गामुळे पोलिसांचे खचलेले नीती धैर्य वाढवण्यासाठी पोलीस कोविड सेंटर तयार केले आणि नंतर प्रतिकारशक्ती वाढवणारा पांडेजींचा काढाही खूपच गाजला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिला रूग्ण आढळला आणि त्यानंतर मालेगाव हॉटस्पॉट ठरला. तेथे विशेष लक्ष पुरवले गेले आणि आयुक्तपदी त्र्यंबक कासार देखील नियुक्त झाले. परंतु उर्वरित ग्रामीण भागात कोरोना संसर्ग टाळण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासमोर होते. ग्रामीण भाग विस्कळीत, दूर आणि अनेक अडचणींचा असताना तेथे कोविड सेंटर्स उभारण्यासह अन्य अनेक मोठी कामे त्यांनी उभी केली.
सर्वात कळीची भूमिका होती ती आरोग्य यंत्रणेची ! जिल्हा शासकीय रूग्णालयात तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि त्यांची टीम, जिल्ह्यात डॉ. कपिल आहेर आणि त्यांची टीम तर नाशिक शहरात डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. आवेश पलोड आणि नंतर डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वाधिक जोखमीत काम करताना शासकीय आणि खासगी रूग्णालयांचा समतेाल साधला. प्रसंगी कारवाई तर प्रसंगी प्रोत्साहन देऊन रूग्णांची सोय करण्याचा प्रयत्न केला. शासकीय यंत्रणेच्या बरोबरीने सेवा देणाऱ्या मविप्रच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय रूग्णालयाचे या काळातील कार्यही संस्मरणीयच झाले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील आणि त्यांच्या टीमने ग्रामीण भागातील कोरोना बाधित आणि काेरोना न झालेल्यांनाही मोठा आधार दिला.
शासकीय कार्यालयात प्रत्येकाने आपल्यावर आलेली जबाबदारी पार पाडली. परंतु ज्यांच्याकडे ही कायदेशीर जबाबदारी नव्हती असे मालेगावचे निवृत्त महापालिका आयुक्त जीवनकुमार सोनवणे आणि बदलीच्या वेटींगवर असलेले नितीन मुंडावरे यांनी तर आपत्कालीन स्थितीत स्वत:हून जबाबदारी स्वीकारली आणि योगदान दिले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर्स आणि तसेच संकट काळात माणुसकी दाखवून गोरगरीब आणि वंचितांना शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या एनजीओ या साऱ्याच लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती निमित्ताने आठवणींना उजाळा देणाऱ्या ठरल्या आहेत.