कोरोनाची लाट; अभ्यागतांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:46+5:302021-03-18T04:14:46+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतर वेळी दररोज ...
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतर वेळी दररोज ७०० ते ८०० अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना गेल्या आठवड्यापासून ही संख्या निम्म्यावर आली आहे. आता दिवसाला केवळ साडेतीनशे ते चारशेच अभ्यागत कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढत आहेत.
जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये-जा सुरू असते. विविध प्रकारचे परवाने, प्रस्ताव, नाहरकत दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजना, सुनावणी आदी कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी, प्रांत,रोजगार हमी, वनहक्क, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, ग्रामपंचायत विभाग, गौणखनिज, रोजगार हमी, संजय गांधी निराधार योजना, मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी आदी ५२ विभाग आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वर्दळ असते.
प्रत्यक्ष मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या नोंदणीनुसार कार्यालयात दररोज ७०० ते ८०० इतके अभ्यागत येतात. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, ही संख्या केवळ ३५० ते ४०० इतकीच झाली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसते.