कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:44+5:302021-05-14T04:14:44+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सध्या लसीकरणाकडे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच संपूर्ण ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सध्या लसीकरणाकडे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच संपूर्ण देशभरात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण पूर्ण झाले तर कोरोनाचा धोका कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे आणि कोरोनाचा धोका कमी झाला तरच गेल्या वर्षभर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे आता शाळा कधी सुरू होणार ते कोरोना लसीकरणच ठरविणार असल्याचा सूर पालक व शिक्षकांमध्ये उमटत आहे. मात्र, अजूनही केवळ १८ आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे. लहान मुलांसाठी अजूनही लस बाजारात आलेली नाही. त्यासोबतच तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असून, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशा परिस्थिती लहान मुलांचे लसीकरणाची प्रकर्षाने गरज भासत असून, त्यांचे लसीकरण झाले तरच शाळाही सुरू होऊ शकणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना परिस्थिती पाहूनच नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणार किंवा नाही याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी स्पष्ट केले आहे.
--
१ लाख १७ हजार विद्यार्थी थेट दुसरीत
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील पहिली ते अकारावी यापैकी एकाही वर्गाच्या परीक्षा झालेल्या नाही. त्यामुळे पहिलीतील सर्व विद्यार्थी थेट दुसरीत दाखल झाले आहेत.
- पहिलीतील सुमारे १ लाख ७० हजार ४५ विद्यार्थी थेट दुसरीत दाखल झाले आहेत. यात ६१ हजार ३२८ मुलांचा, तर ५५ हजार ७१७ मुलींचा समावेश आहे.
- शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा होत नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांचे निकाल तयार केले जातात. परंतु, यावर्षी शाळाच सुरू झाल्या नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी वर्गोन्नत करण्यात आले आहेत.
--
शिक्षणाधिकारी म्हणतात परिस्थितीनुसार निर्णय
गेल्यावर्षी एकही दिवस शाळा भरली नाही. परंतु, कोरोनाची परिस्थिती बघता ज्या गावात महिनाभर एकही रुग्ण आढळलेला नाही, अशा गावांसह ऑनलाईन सुविधा नसलेल्या अतिदुर्गम भागात काही ठाकाणी शाळा सुरू होत्या. यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणेच शाळांसदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले.
---
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक
गेल्या वर्षभरात एकही दिवस शाळेत जाता आले नाही. आता लसीकरण सुरू झाल्यामुळे शाळा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मित्र शाळेत एकत्र येऊन मौज मस्तीसोबतच अभ्यास करणे आनंददायी होईल. त्यासाठी लवकर लसीकरण पूर्ण होऊन शाळा सुरू होणे आश्यक आहे.
- अथर्व शिरसाठ, विद्यार्थी
---
सध्या लसीकरण सुरू असले तरी अजूनही पूर्ण शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी अद्याप लस आलेली नाही. अशा स्थितीत प्रत्यक्ष शाळा कशी सुरू होणार याविषयी साशंकता आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गातच शिकविलेले अधिक समजते . त्यामुळे लहान मुलांचेही लसीकरण लवकरात लवकर करून शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
-- राजेंद्र निकम, शिक्षक
----
कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यातच मोठ्यांचे लसीकरणही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण केव्हा होणार आणि शाळा कधी सुरू होणार याविषयी स्पष्टता नाही. मात्र, मुलांना अशा प्रकारे अधिक दिवस शाळेपासून दूर ठेवता येणार नाही. शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.
विलास पवार , पालक
--
ऑनलाईन आणि ऑफलाईन
- गेल्या वर्षी शहरातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणच दिले गेले. हाच पर्याय यावर्षीही शिक्षण विभागासमोर असणार आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यास ऑनलाईनसोबतच ऑफलाईन शिक्षणाचाही विचार करता येईल .
-ग्रामीण भागात काही ठिकाणी ऑफलाईन शिक्षण दिले गेले. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका वाढल्याने ग्रामीण भागातही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायांचा शिक्षण विभागाला विचार करावा लागणार आहे.