कोरोना रुग्णांंच्या समुपदेशनासाठी लागणार टीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:12 AM2020-07-04T00:12:28+5:302020-07-04T00:48:37+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असताना मानसिक दडपणाखाली असण्याची शक्यता असते. कोविड कक्षात त्यांच्यावर उपचार करणारे पीपीई सूटमधील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घेण्यात येणारी काळजी, अनेकदा होणाºया चाचण्या, उपचारासाठीचा कालावधी, तसेच रुग्णाचे नातेवाईकही त्यांना भेटू शकत नसल्याने दडपण अधिकच वाढू शकते. ही बाब लक्षात घेता कोरोना रुग्ण मानसिक दडपणाखाली येऊ शकतो. उपचारादरम्यान रुग्णाचे मनोबल सक्षम असणे अपेक्षित असल्याने कोरोना रुग्णांसाठी आता कक्षातील टीव्हीवरून शहरातील मानसोपचार तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांनी आखली आहे.
प्रत्येक कोरोना वॉर्डमध्ये टीव्ही संच बसविण्यात येणार असून, या माध्यमातून रु ग्णांना समुपदेशन आणि मनोरंजनदेखील केले जाणार आहे. रु ग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स, शहरातील मानसोपचार तज्ज्ञ हे कक्षातील टीव्हीवरून रुग्णांचे समुपदेशन करून तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
कारोना रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा यासाठी कक्षात मोबाइल फोनची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. सकाळी १२ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजताची वेळ रु ग्णांच्या नातेवाइकांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यासाठी देण्यात आली आहे. सदर उपाययोजना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या सूचनेनंतर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.