कोरोना रूग्णांमध्ये करणार म्युकरमायकोसिस बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:27+5:302021-05-20T04:15:27+5:30
नाशिक : म्युकरमायकोसिस आजाराच्या जनजागृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स बैठकीत कोरोना रुग्णांना डिस्जार्च देताना त्यांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शक ...
नाशिक : म्युकरमायकोसिस आजाराच्या जनजागृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स बैठकीत कोरोना रुग्णांना डिस्जार्च देताना त्यांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून, तत्काळ वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या टास्क फोर्स बैठकीत कोविड रुग्णाला डिस्जार्च देताना या आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी
सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस आजार जनजागृतीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर हा विषय हाताळण्यासाठी एक टास्क फोर्स मागील आठवड्यात गठित केलेला आहे.
टास्क फोर्समधील तज्ज्ञांच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याबाबतचे ठरविण्यात आले. या सूचना संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व रुग्णालयांना पाठवण्यात येणार आहे. कोरोना रुग्णास डिस्चार्ज देताना त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सूचनापत्र देण्यात येणार आहे. ही कार्यपद्धती यापुढे जिल्ह्यात कायम राहणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
---इन्फो---
१) म्युकरमायकोसिस ( काळी बुरशी ) काय आहे ?
-
अतिजलद पसरणारा बुरशीचा रोग. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो. परंतु योग्य उपचार न केल्यास रुग्णांना दृष्टी किंवा प्राण देखील गमवावा लागू शकतो.
२) म्युकरमायकोसिसची लक्षणे
नाक कोरडे पडणे, नाकातून तपकिरी व लाल रंगाचा स्त्राव गळणे, डोळ्याभोवती काळे होणे, तीव्र डोकेदुखी व सूज, दातदुखी व सौम्य ताप, डोळ्यांना कमी दिसणे.
३) ) अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान स्टेराॅईड यासारख्या औषधांच्या अतिरिक्त वापराचा परिणाम
४) कृत्रिम श्वासोच्छवास मशीनचा अतिवापर.
५) प्रमाणाबाहेर प्राणवायूचा वापर.
६) रोगप्रतिकार शक्ती कमी असणे
- लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करावी
शासकीय अथवा खासगी सेंटरमधून आंतररुग्ण काेरोनामुक्त झालेले आहेत, अशा रुग्णांनी दर सात दिवसांनी वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी, तसेच जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालये येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--इन्फो--
----घ्यावयाची काळजी...
-
मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण करावे, छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून एकदा आठवड्यानंतर तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.