कोरोनाला किक, पहिनेला पिकनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:41+5:302021-06-19T04:10:41+5:30
तालुक्यात कोरोना बाधितांचा आलेख पूर्णपणे घसरला आहे. तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असतानाच शासनाने निर्बंध शिथिल केल्याने पर्यटकांचा पावसाळी पर्यटनासाठी ...
तालुक्यात कोरोना बाधितांचा आलेख पूर्णपणे घसरला आहे. तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असतानाच शासनाने निर्बंध शिथिल केल्याने पर्यटकांचा पावसाळी पर्यटनासाठी तालुक्यातील निसर्गसंपन्न भागात ओघ सुरू झाला आहे. शनिवार - रविवारी या भागात पर्यटकांची वाहनांसह मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पोलिसांकडून पेगलवाडी फाट्यासह पहिनेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जात असली तरी पर्यटक आडवाटेने आपल्या निसर्गपर्यटनाची हौस भागवताना दिसून येत आहेत. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात निसर्गाचे आकर्षण असलेल्या अंबोली घाट, दुगारवाडी धबधबा, वाघेरा - हरसुल घाट आणि विशेष म्हणजे प्रसिध्द असलेली 'धाबे'नगरी पहिने परिसरात गर्दी होत असते. अजून पावसाळ्याला दमदार अशी सुरुवात झालेली नाही. मात्र, यापुढील काळात याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. परंतु पर्यटकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोनाविषयक नियमांचे पुरते उल्लंघन केले जात असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे.
पोलिसांनी या परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी हाेत आहे.