जिल्ह्यात लोकसहभागातून ‘कोरोनामुक्त गाव अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:31 AM2021-04-26T01:31:57+5:302021-04-26T01:32:50+5:30
कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
सायखेडा : कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गटविकास अधिकारी यांच्यासह जवळपास १४०० ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्याशी नुकताच संवाद साधला. त्यानुसार ग्रामीण भागात क्षेत्रीय पातळीवर कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्राची आखणी, प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची देखरेख याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे.
लोकसहभाग वाढवून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गावातच लक्ष देऊन नियोजन केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
काही गावांमध्ये १०० वर रुग्ण होते. ही संख्या १० च्या खाली आणण्यात यामुळे यश आले आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने दबाव वाढता
आहे.
अनेक लोक गृह विलगीकरणात न थांबता बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना गावात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्राशी संबंधित कर्मचारी योग्य काळजी घेऊन घरोघरी न जाता एका जागेवर सेवा देणे शक्य होत आहे.
अनेकजण राहून घरामध्ये लक्षणे लपवून ठेवणे, वेळेवर उपचार न करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे नियोजन करून संबंधितांची योग्य उपचार, घरगुती आहार याबाबत नियोजन केले जात आहे. त्यामुळे किमान १० दिवस रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात थांबून कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
हॉटस्पॉट गावांवर विशेष लक्ष
nहॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये ४५ वयोगटावरील १०० टक्के नागरिकांच्या लसीकरणावर भर.
nरुग्णांसाठी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था.
nरुग्ण आढळून आल्यास कंटेनमेंट झोन तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार.