कोरोनाचे सावट; मात्र संमेलनाचे कामकाज सुरळीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:55+5:302021-02-23T04:22:55+5:30
नाशिक : मार्चअखेरीस होणाऱ्या साहित्य संमेलनाला अजून महिनाभराचा कालावधी बाकी असला तरी स्वागताध्यक्षच बाधित झाल्याने तसेच बाधितांच्या संख्येतही लक्षणीय ...
नाशिक : मार्चअखेरीस होणाऱ्या साहित्य संमेलनाला अजून महिनाभराचा कालावधी बाकी असला तरी स्वागताध्यक्षच बाधित झाल्याने तसेच बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होऊ लागल्याने साहित्य संमेलनाच्या आयोजनावर कोरोनाचे सावट घोंगावू लागले आहे. कोरोनाचे सावट जाणवू लागले असले तरी संमेलनाचे नियमित कामकाज सुरू असून सोमवारीदेखील विविध समित्यांच्या बैठकांची सत्रे पार पडली.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासमवेत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारीच पत्रकार परिषद घेऊन सर्व दक्षता घेऊन संमेलन पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतरच्या २४ तासात भुजबळच कोरोनाबाधित झाल्याने सर्व पदाधिकारीदेखील चिंतेत पडले होते. महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील हे औरंगाबादला रवाना झाले असून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकरदेखील नियमित कामकाजात व्यस्त आहेत. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनावर कोरोनाचे सावट असले तरी सध्या तरी कामकाज, समित्यांच्या बैठका नियमितपणे सुरू आहेत. कोरानाबाबत वेळीच दक्षता घेतली तर त्याचा प्रसार वेळेत रोखला जाईल आणि संमेलन व्यवस्थितपणे पार पडण्याची आयोजकांना आशा आहे.
इन्फो
स्वच्छता, निधी संकलन बैठक
संमेलनाच्या कार्यालयात सोमवारी स्वच्छता, पाणीपुरवठा व विद्युत समितीची बैठक समितीप्रमुख सुनील वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चर्चा होऊन कामांचे वाटप करण्यात आले. यावेळी नंदकिशोर हरकुट, तुषार सावरकर, संतोष बेलगावकर, सुनील वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक संमेलनात निधी संकलन समिती प्रमुख रामेश्वर कलंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. छोट्या देणग्यांमध्ये रु. १०० ते रु ५०० देणाऱ्यांसाठी स्वतंत्र पावती पुस्तके आहेत. जास्त रकमेची देणगी देणाऱ्यांना स्वतंत्र पावतीपुस्तके देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.