कोरोनाचा बाजा अन् पथकांचा वाजला बॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:34 PM2020-04-20T23:34:41+5:302020-04-20T23:35:07+5:30

चंद्रमणी पटाईत । नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ...

Corona's Baja and the band's band play! | कोरोनाचा बाजा अन् पथकांचा वाजला बॅण्ड!

कोरोनाचा बाजा अन् पथकांचा वाजला बॅण्ड!

Next
ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल ठप्प : बॅण्डमालक, कलाकारांवर उपासमारीची वेळ

चंद्रमणी पटाईत ।
नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे व महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्वच सोहळे रद्द करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यातच यंदाचा लग्नसराईचा हंगाम संपत आल्याने बॅण्ड पथकाच्या चालक-मालकांसह कलाकारांवर व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत बॅण्ड व्यावसायिक सापडले आहेत.
कोरोनामुळे लोकांचे आयुष्य थंडावलं आहे. एका क्षणात हा वेग जणू शून्यावर आला आहे. कोणाला हा वेळ खायला उठलाय, तर या रिकामपणाचं काय करायचं असा प्रश्न काहींना पडलाय. अनेकांवर रोजगाराआभावी भूकबळीची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक बॅण्ड पथकांचा उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराईमुळे सुकाळ असतो. चार महिन्यात वर्षभर पुरेल एवढी पुंजी ते जमा करतात, मात्र यंदा कोरोनाने अचानक आक्रमण केले आणि सुखाचा घास हिरावून नेल्याची भावना कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे बॅण्ड व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वच सोहळे रद्द झाल्याने मंगलवाद्यांवरही बंदी आली आहे. यामुळे केवळ वादकांवर उपासमारीची वेळ आहे. त्याचप्रमाणे १४ एप्रिलनिमित्त डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महिनाभर मिरवणुका निघतात. त्यात बॅण्ड पथकांना मोठी मागणी असते; परंतु जयंती, उत्सव रद्द केल्याने वादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जनजागृती मोहिमेत सहभाग द्यावा
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, गैरसमज दूर व्हावेत, विविध उपाययोजनांबद्दल चर्चा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. शासनाकडून विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत शासनाने जर बॅण्ड पथकांना सामावून घेतले आणि कलावंतांना मानधन दिले तर त्यांना नक्कीच जगण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी आधार मिळू शकेल, अशी भावना पथकांच्या संचालकांकडून व्यक्त होत आहे.

लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने कलाकारांकडे लक्ष द्यावे. लॉकडाउन लवकर उठल्यास आम्हाला कार्यक्रम मिळतील. रोजीरोटी मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. बॅण्ड पथकही सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून मंगलकार्य पार पाडतील. लॉकडाउनमधून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे, त्यात बॅण्डचाही समावेश व्हावा. - शेख मास्टर
झंकार ब्रासबॅण्ड, साकोरा

आम्ही कारागिरांना वर्षभराचे पेमेंट आगाऊ केलेले असते. मात्र हा सीझन पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे आमच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातही ज्या कारागिरांना मदत हवी असते त्यांना आम्ही फुल नाही फुलाच्या पाकळीची मदत करत आहोत. लॉकडाउन सुरू असेपर्यंत आम्ही आमच्या परीने मदत करत राहू. अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लवकरच कोरोनाचे संकट दूर जाईल अशी अपेक्षा आहे.
- दिलीप सोनवणे, संचालक, स्वरसम्राट ब्रास बॅण्ड, सटाणा

आमच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हालाच सुपारी (आॅर्डर) मिळत नसल्याने काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचा बॅण्ड लॉन्सला जोडलेला आहे; परंतु सध्या लॉन्स बंद असल्याने लॉकडाउन कधी संपेल याची प्रतीक्षा आहे. कारागिरांना द्यावा लागणारा अ‍ॅडव्हान्स घरातील दागिने गहाण ठेवून दिला आहे.
- विनोद सोनवणे
श्री स्वामी समर्थ ब्रासबॅण्ड, नाशिक

Web Title: Corona's Baja and the band's band play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.