साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:01+5:302021-02-24T04:16:01+5:30
नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना ...
नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना काळामुळे नाशिकमध्ये साहित्य संमेलन व्हावे की नको याबाबत अनेक मतेमतांतरे सुरुवातीपासूनच होती. मात्र, नंतर कोरोनासंदर्भात आरोग्य नियमांची काळजी घेतली जाईल. सुरक्षित अंतरासाठीच संमेलनस्थळी मोठे मैदान घेण्यात आले आहे, रुग्णालयात खाटादेखील राखीव ठेवण्यात येतील, असे सांगून आयोजकांनी संमेलनाचे समर्थन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कोराेनाबाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी (दि.२१) पालकमंत्री भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.
साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. शासनाचे धोरण आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे आशादायी चित्र असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले आहे.
कोट...
सध्या तरी वाट पाहणे हीच भूमिका ठेवावी लागणार आहे. शासनाच्या त्या वेळच्या निर्देशानुसार संमेलन पार पडेल. तसा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आलीच, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतील.
-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ