‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:08 PM2020-06-25T23:08:11+5:302020-06-25T23:10:30+5:30

नाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या तुलनेत चांगले आहे.

Corona's dream of 'Cycle City'! | ‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ !

‘सायकल सिटी’च्या स्वप्नाला कोरोनाचे बळ !

googlenewsNext
ठळक मुद्दे गिअरच्या सायकल्सना मागणी


अनलॉक : लॉकडाऊन उठल्यापासून सायकल्सच्या विक्रीत दीडपटीने वाढ; आरोग्याबाबत जागृती वाढली

 

धनंजय रिसोडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक महानगराला सायकल सिटी बनवण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनसह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. सर्वस्तरीय प्रयत्नातून नाशिकमध्ये सायकलची चळवळ रुजण्यास मदत झाल्याने नाशिकमध्ये सायकलविक्रीचे प्रमाणदेखील अन्य महानगरांच्या तुलनेत चांगले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात नागरिकांना व्यायाम आणि निरोगी राहण्यासाठी सायकलचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवल्यामुळे जिल्ह्यातील सायकल विक्रीचे प्रमाण गत महिन्यात दीडपट ते दुपटीने वाढले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात स्वत:चे आरोग्य जपणे, तंदुरुस्ती वाढविणे यासह प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने घरांमध्ये अडकलेल्या बहुतांश नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या व्यायामाचा, योगासनांचा किंवा सायकल चालविण्याचा व्यायाम केला. त्यातील बहुतांश सायकल्स या घरातील मुलांसाठी आणलेल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातच घरोघरच्या कर्त्या व्यक्तींना सायकल्सचे महत्त्व आणि महात्म्य अधिकच प्रकर्षाने जाणवले.
निर्बंध शिथिल झाल्यापासून शेकडो घरांमधील कर्त्या नागरिकांनी स्वत:साठी सायकल खरेदीसाठी दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. यंदाचा गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातच आल्याने त्या काळात होऊ न शकलेली विक्री लॉकडाऊन उठल्यानंतर होत असल्याने विक्रेत्यांनादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.

गिअरच्या सायकल्सना मागणी

नाशिकमध्ये सायकल दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून गिअरच्या सायकलिंगबाबत प्रामुख्याने विचारणा होत आहे. गिअरच्या सायकल्स १५ हजारांपासून उपलब्ध आहेत. तसेच साध्या बिनागिअरच्या सायकल्सनादेखील चांगली मागणी असून, सहा हजारांपासून साध्या सायकल्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

होम एक्सरसाइज सायकल्सची चलती...
ज्या नागरिकांना घराबाहेर जाऊन सायकल चालविणे शक्य नसते, अशा नागरिकांकडून होम एक्सरसाइज सायकल्सनादेखील चांगली मागणी आहे. या सायकल्स दहा हजारांपासून पुढे अशा श्रेणीत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरात पुरेशी मुबलक जागा आहे, अशा नागरिकांकडून या सायकल्सचीच मागणी केली जात आहे. लॉकडाऊन उठल्यापासून साध्या सायकल्सच्या विक्रीत दीडपट तर गिअरच्या सायकल्सच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. कमी अधिक प्रमाणात बहुतांश सायकल दुकानांमध्ये हीच परिस्थिती आहे. गत अनेक वर्षे सर्व स्तरांवरून सायकल वापराच्या फायद्याचे जे महत्त्व सांगितले जात होते, ते कोरोनाच्या काळात नागरिकांना प्रकर्षाने जाणवल्यानेच ही विक्रीतील वाढ दिसून येत आहे.
- किशोर काळे, सायकल व्यावसायिक

Web Title: Corona's dream of 'Cycle City'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.