सटाण्यात कोरोनाचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:20 PM2020-05-05T21:20:12+5:302020-05-05T23:09:50+5:30
सटाणा : कुचकामी यंत्रणेमुळे सर्वच पातळीवर फज्जा उडत असल्याने सटाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नितीन बोरसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : कुचकामी यंत्रणेमुळे सर्वच पातळीवर फज्जा उडत असल्याने सटाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बागलाण तालुक्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सहा ठिकाणी कोरोना संशयितांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये अजमिर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य रेसिडेन्सियल स्कूल, नामपूर, सटाण्यात चार ठिकाणचा समावेश आहे. मात्र बहुतांश ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची मोठी समस्या दिसून येत आहे. सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात मालेगावसह बाहेरगावाहून येणारे लोंढे अपुऱ्या पोलीस बळामुळे रोखण्यात यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळेच सटाण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शहरात सोशल डिस्टन्सिंचादेखील फज्जा उडाला आहे. संपूर्ण शहरात गर्दीच गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे.
---------------
अपुरे शिवभोजन केंद्र..
कामाअभावी परप्रांतीय अथवा स्थानिक मजुरांची उपासमारी होऊ नये म्हणून शासनाने पाच रु पयात शिवभोजन थाळीची व्यवस्था केली आहे. सध्या बागलाण तालुक्यातील सटाण्यात १५० थाळीचे दोन केंद्र सुरू केले आहे. मात्र ते शहरासाठी अपुरे पडत असून, शहरात आणखी तीन केंद्र तर नामपूर येथे दोन, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
------------
मोफत धान्याचे वाटप
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. याचा अटकाव करण्यासाठी शासनाने लॉकडाउनसारखे कठोर पाउल उचलल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकावरही परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. या लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्नपाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य दिले जात आहे.
----------------------------
परप्रांतीय मजुरांची प्रशासनाकडून सोय
झारखंड, राजस्थान येथील दीडशेहून अधिक कामगार, मजूर अडकले आहेत. त्यांच्यासाठी तसेच स्थानिक मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुचविण्यात आली आहेत. नामपूर परिसरात साठ ते सत्तर जण थांबले असून, त्यांच्या अन्नधान्याची सोय प्रशासनाने केली; मात्र त्यांनी चांगल्या प्रतीचा गहू आणि तांदूळ नसल्याची तक्र ार करत शिधा नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या साठ ते सत्तर जणांनी एवढ्यावरच न थांबता आम्हाला चांगल्या प्रतीचा गहू, तांदूळ तर द्याच; परंतु किराणा साहित्य आणि भाजीपालादेखील भरून द्या, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने मात्र हात वर करत आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो; परंतु आपली मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे सांगितल्याने आमचे काम मजुरीचे नसल्याचे सांगत ते आजही आपल्या मागणीवर ठाम आहेत.