कोरोनामुळे पित्याचे अंतिम दर्शनही ऑनलाइन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:19 PM2021-04-05T23:19:31+5:302021-04-06T00:15:54+5:30
सिडको : कोरोनामुळे दुसऱ्या शहरात निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन कोरोनाबाधित मुलाला अखेर व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन घ्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना सिडको येथे घडली. या घटनेला प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
सिडको : कोरोनामुळे दुसऱ्या शहरात निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन कोरोनाबाधित मुलाला अखेर व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन घ्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना सिडको येथे घडली. या घटनेला प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
कोरोनाच्या या संकटकालीन परिस्थितीमध्ये अशी उदाहरणे बाहेर येत आहेत की जी ऐकून व बघून कठोरातील कठोर व्यक्तीच्या हृदयालादेखील पाझर फुटेल. असाच काहीसा प्रसंग नुकताच घडला की ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहिले नाही. सिडकोत राहणारे राजेंद्र सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने बाधित आहेत. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. अशातच जळगाव येथे राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. अशा वेळी त्यांना गावी जाणेही कठीण होते, परंतु वडिलांच्या अंत्यविधीला आपण जाऊ शकत नाही याची खंत मात्र त्यांच्या मनात सलत होती. अखेर त्यांच्या आप्तस्वकीयांनी वडिलांचे अंत्यदर्शन व्हिडीओ कॉलद्वारे करून देत त्यांची इच्छा पूर्ण केली. वडील व मुलाचे हे दृश्य पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्यातही या वेळी अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
ज्या वडिलांनी आयुष्यभर आमच्या परिवारासाठी कष्ट केले, त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. अशी वेळ कोणावरही येऊ नये. सर्वांनी या काळात आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
- राजेंद्र सूर्यवंशी, उत्तमनगर, सिडको