पोलीस अकॅडमीमध्ये कोरोनाचा शिरकाव; १६७ प्रशिक्षणार्थींना झाली विषाणूची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:25 AM2020-12-25T05:25:53+5:302020-12-25T05:26:20+5:30
CoronaVirus News : आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
नाशिक : येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील १२७ रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनपासून पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांपासून स्वयंपाकीसह चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचारीवर्गाला मुख्य उंबरठा ओलांडण्यास मज्जाव केला आहे. बाहेरून
येणाऱ्या वाहनांना अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक करून
प्रवेश दिला जात आहे. अधिकारीवर्गाला तपासणी करून प्रवेश दिला जात आहे.
प्रशिक्षण कालावधी लांबणार
कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे येत्या जानेवारीमध्ये पूर्णत्वास येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांच्या २०२० च्या बॅचचा प्रशिक्षण कालावधीसुद्धा आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशिक्षण थांबले आहे.
लग्नाला जाणे ‘महाग’
- नातेवाइकाच्या लग्नासाठी एक प्रशिक्षणार्थी प्रवास करून आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव अकॅडमीमध्ये झाल्याची चर्चा.
- कोरोनाचा शिरकाव मागील आठवडाभरापूर्वीच अकॅडमीमध्ये झाला असून, येथील प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना तोंडावर मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. बहुतांश संशयितांना विलगीकरणातही ठेवण्यात आल्याचे समजते.