शासकीय चित्रकला परीक्षेला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:19+5:302020-12-26T04:12:19+5:30
नाशिक : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला काेरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, सध्या ऑनलाइन वर्गच सुरू आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले ...
नाशिक : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला काेरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, सध्या ऑनलाइन वर्गच सुरू आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याने चिंता कायम आहेच. माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र शासकीय चित्रकलेचे भवितव्य अजूनही अंधारातच असल्याने यंदा या परीक्षा होणार आहे की नाही? याविषयी पालक आणि विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत. शालेय पातळीवर एलिमेंट्री व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री परीक्षा दिलेली आहे. त्यांना या शैक्षणिक वर्षात इंटरमिजिएट परीक्षा द्यायची होती; परंतु कला संचालनालयातर्फे अद्यापही याबाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना एलिमेंट्री परीक्षा द्यायची होती आणि त्यांनी घरी सरावही सुरू केलेला आहे. त्यांच्यापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या परीक्षा होणार आहेत की नाही? तसेच चित्रकलेतील विद्यार्थ्यांच्या गुणांचे काय, असा प्रश्न विद्यार्थी विचारत असल्याने महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने याप्रकरणी कला संचालनालयाला निवेदन सादर केले आहे. शासकीय चित्रकला परीक्षा घेण्यात याव्यात, किंवा इयत्ता दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या धर्तीवरती एलिमेंट्री परीक्षेचा विचार करून गुणदान देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी निवेदनात केली आहे.
कला क्षेत्रासह अनेक क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी शासकीय परीक्षांमुळे उपलब्ध होत असतात. एलिमेंट्री व इंटरमिजिएट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीमध्ये श्रेणीनिहाय अतिरिक्त गुण मिळत असतात. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षा देत असतात. मात्र यंदा या परीक्षा होतील की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षांचे नियोजन करा, किंवा भूगोलाच्या धर्तीवर फक्त एलिमेंट्री पास विद्यार्थ्यांना दहावीसाठी श्रेणीनिहाय अतिरिक्त गुण देण्यात यावे, अशी मागणी महासंघाने केली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, चंद्रशेखर सावंत, योगेश रोकडे, मिलिंद टिळे, प्रशांत पांडे, संदीप पांडे, रमेश वारे, कपिलदेव कापडणीस, राम लोहार, भगवान तेलोरे, सारंग घोलप, योगेश राजोळे, मनोज मोगरे, यासह कलाशिक्षकांनी केली आहे.