पंढरीला जाणाऱ्या दिंडीवर कोरोनाचे प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:52+5:302021-06-03T04:10:52+5:30

नाशिक : मागील वर्षी कोरोनाने पंढरीची वारी हुकवली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची दिंडीद्वारे जाणारी पालखी एस. टी. महामंडळाच्या ...

Corona's question mark on the road leading to Pandhari | पंढरीला जाणाऱ्या दिंडीवर कोरोनाचे प्रश्नचिन्ह

पंढरीला जाणाऱ्या दिंडीवर कोरोनाचे प्रश्नचिन्ह

Next

नाशिक : मागील वर्षी कोरोनाने पंढरीची वारी हुकवली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची दिंडीद्वारे जाणारी पालखी एस. टी. महामंडळाच्या शिवशाही बसमधून नेण्यात आली होती. यंदा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध १५ जूनपर्यंत वाढवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाही त्र्यंबकेश्वरहून पंढरीला दिनांक २४ जून रोजी निघणाऱ्या निवृत्तीनाथांच्या दिंडीवर कोरोनाचे प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

मागील वर्षी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरहून निघणारी संत निवृत्तीनाथांची दिंडी व पालखी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमधून विश्वस्तांसह मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला पोहोचली होती. आषाढी एकादशीला मुक्काम करून पालखी पुन्हा दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्र्यंबकेश्वरला माघारी परतली होती. यंदाही त्र्यंबकेश्वरहून पालखीचे प्रस्थान २४ जून २०२१ रोजी होण्याचे नियाेजित आहे. परंतु जिल्ह्यात व त्र्यंबकेश्वर येथेही कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी राज्य शासनाने १५ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात तिसरी संभाव्य लाट पाहता राज्य शासनाकडून १५ जूननंतरही निर्बंध लागू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दि. २४ जून रोजी त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या दिंडी पालखी सोहळ्याला यंदाही शासनाकडून परवानगी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. यदाकदाचित वातावरण आणखी निवळले, तर काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीला परवानगी मिळू शकेल. परंतु, त्यातही संदिग्धता कायम आहे.

इन्फो

यंदाही शिवशाहीची विनामूल्य सेवा?

मागील वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून पंढरपूरला जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना शिवशाही बसची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली होती. मात्र, एसटी महामंडळाने त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ संस्थानकडून शिवशाही बसचे भाडे वसूल केले होते. त्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर एसटी महामंडळाने लगोलग रकमेचा धनादेश संस्थानला परत केला होता तर परिवहन मंत्र्यांनीही संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले होते. यंदाही कोरोनामुळे शिवशाही बसेसची व्यवस्था करण्याची वेळ आली तर महामंडळाने किमान ती सजवून द्यावी, अशी अपेक्षा वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Corona's question mark on the road leading to Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.