श्रीकृष्ण जन्मोत्सवावरही कोरोनाचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 07:13 PM2020-08-10T19:13:41+5:302020-08-10T19:16:27+5:30
नाशिक : कोरोनाच्या सावटातच यंदा कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा केला जातो. कृष्ण जन्मानंतर पाळण्यात त्याला जोजवले जाते. मात्र, कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद असल्याने केवळ मंदिरातील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा कृष्णजन्म होणार असून, भाविकांना मात्र कृष्णजन्मासह गोपाळकाल्याच्या सोहळ्याला मुकावे लागणार आहे.

कृष्ण जन्मोत्सवानंतर कृष्णजन्माची गाणी गाऊन पूजन केले जाते. त्यानंतर दिवसभराचा उपवास सोडला जातो. या सर्व प्रथांचे पालन यंदादेखील पुजाऱ्यांच्या स्तरावर होणार असले तरी मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नसल्याने भाविकांविनाच कृष्णजन्माचा सोहळा रंगणार आहे. नाशिकमध्ये कापडपेठेतील कृष्ण मंदिरासह शहरातील अन्य कृष्ण मंदिरांमध्ये स्थानिक स्तरावर हा सोहळा रंगणार आहे.
दरम्यान, बुधवारी गोपाळकाला असल्याने त्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. गोकुळातील गवळ्यांच्या घरातील मुलांना दही, लोणी द्यायचे टाळून ते मथुरेला पाठविले जात असल्याने कृष्णाने सवंगड्यांसह एकावर एक थर रचून दहीहंडी करीत हंड्यांमधील दही, लोणी खाल्ल्याचे स्मरण म्हणून दहीहंडी रचून गोपाळकाला केला जातो. त्यामुळे कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला हा खाद्यपदार्थ कृष्णास फार प्रिय होता. त्यामुळे सर्व बालगोपाळांना एकत्र बोलावून दहीहंडी काला करण्याची प्रथा असून, त्या साहसी खेळालादेखील यंदा कोरोनामुळे खीळ बसणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी केवळ घरोघरी असलेल्या बालकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करूनच जन्मोत्सव साजरा करावा लागणार आहे.