सटाण्यात कोरोनाचा बळी; पाच बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:47+5:302021-02-18T04:25:47+5:30
शहरात नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. शासनाने नियम अटी लागू करून लग्नसोहळे, शाळा, महाविद्यालय, आठवडे बाजार आणि ...
शहरात नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. शासनाने नियम अटी लागू करून लग्नसोहळे, शाळा, महाविद्यालय, आठवडे बाजार आणि बसेस सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नागरिकांमधून नियमांची अक्षरशः पायमल्ली केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तोंडाला ना मास्क लावला जातो ना सामाजिक अंतर ठेवले जात आहे. सुशिक्षित नागरिकदेखील कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचे भान ठेवत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचाच परिपाक म्हणून आता पुन्हा कोरोनाने शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सहा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला असताना त्यातील ३४ वर्षीय महिलेचा बुधवारी (दि. १७) सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे..
इन्फो
प्रशासनही बेफिकीर
शहरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मान्यता दिली आहे. मात्र या सेंटरकडून कोरोनाबाधित रुग्णांबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला दैनंदिनी कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना कुठल्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले. नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिल्यानंतर थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक असताना प्रशासनच बेफिकीर असल्याचे समोर आले आहे..