गडावरील चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:26+5:302021-04-14T04:13:26+5:30
चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने यात्रेवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थ, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. सप्तशृंगी निवासिनी ...
चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने यात्रेवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थ, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक, फ्युनिक्युलर ट्रॉली परिवहन मंडळ, खासगी वाहतूक आदी सर्व व्यवसायाला सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक फटका बसणार असल्यामुळे यंदाही कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. आदिमाया सप्तशृंगीचा वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव २१ ते २७ एप्रिल दरम्यान होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सवही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने ११ मार्चपासून मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने तेव्हाही चैत्रोत्सव रद्द केला होता. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर १६ नोव्हेंबर २०२० रोजी अटी - शर्ती व कोविड नियमांचे पालन करून मंदिर भाविकांना खुले केले होते. यात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव व कावडयात्रादेखील रद्द करण्यात आली होती.
दरवर्षी चैत्रोत्सवासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यांतून सुमारे दहा लाखांवर भाविक हजेरी लावतात. यात खानदेशातून तीन ते चार लाख भाविक पदयात्रेने येण्याची परंपरा होती. ती कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, देवस्थान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मंदिरे बंदच असून चैत्रोत्सवाबाबत ट्रस्टची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
इन्फो
ऑनलाईन दर्शनाची सुविधा
मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी आदिमायेची नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू असून, देवीचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी लाइव्ह ऑनलाईन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने अगोदरपासूनच उपलब्ध करून दिली आहे. तसेच व्हॉट्सॲप , फेसबुकद्वारे आदिमायेच्या मूर्तीचा दररोजचा फोटो नियमित प्रसारित करण्यात येत आहे. राज्यातील व जिल्ह्यातील वाढती कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन भाविकांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षितेसाठी घरात बसूनच आदिमायेचे दर्शन घेण्याचे आवाहन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे .
इन्फो
३० कोटींचा फटका
सप्तशृंगी गडावर शेती व औद्योगिक क्षेत्र नसल्याने नारळ, प्रसाद, कुंकू, हार, खेळणी व कटलरी, हॉटेल, लॉजिंग या भाविकांशी निगडित असलेल्या घटकांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मागील वर्षीचा चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीतील अर्थप्राप्तीच्या कालावधीत मंदिर बंद असल्याने देवस्थान आणि स्थानिक व्यावसायिक यांना फटका बसला. शिवाय फ्युनिक्युलर ट्रॉलीसह परिवहन महामंडळ असा सर्वांना सुमारे ३० कोटींचा फटका बसला होता. त्यातून काहीसे सावरत असताना पुन्हा एकदा चैत्रोत्सवात देवालय बंद झाल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार असल्याची चिंता सतावत आहे.
फोटो- १३ सप्तशृंगी गड
===Photopath===
130421\13nsk_10_13042021_13.jpg
===Caption===
फोटो- १३ सप्तशृंगी गड