मांगीतुंगीच्या कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:55 PM2021-07-08T22:55:26+5:302021-07-08T23:04:03+5:30
नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील प्रसिद्ध भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीच्या पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जैन समाजाचा पवित्र कुंभमेळा भरणार आहे, मात्र या कुंभमेळ्यालाही कोरोनाचा अडसर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही देवस्थान समितीने कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील प्रसिद्ध भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीच्या पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जैन समाजाचा पवित्र कुंभमेळा भरणार आहे, मात्र या कुंभमेळ्यालाही कोरोनाचा अडसर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही देवस्थान समितीने कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे.
सन २०१५ मध्ये भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर दर सहा वर्षांत मांगीतुंगी येथे कुंभमेळा भरणार असल्याची घोषणा पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी केली होती.
मांगीतुंगी पहाडावर अखंड पाषाणात कोरलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा गेल्या ११ फेब्रुवारी २०१५ पासून दीड महिने पंचकल्याणक व महामस्तकाभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देशभरातील आचार्य, मुनी, माताजी, साध्वीसह बारा ते पंचवीस लाखांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने या सोहळ्याला कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते. शासनानेही जैन धर्मीयांच्या या कुंभमेळ्याला शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप देऊन मांगीतुंगी आणि परिसराच्या विकासासाठी २७५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली होती.
कुंभमेळा फेब्रुवारी २०२२ मध्ये?
समितीच्या बैठकीत आगामी कार्यक्रमही जाहीर करण्यात आले आहेत. जैन धर्मीयांच्या या सोहळ्याला आता कुंभमेळ्याचे स्वरूप देण्यात आले आहे. हा मेळा दर सहा वर्षांनी भरणार असल्याचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी जाहीर केले होते. आगामी सोहळा येत्या २०२२ मधील फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्याच्या तारखा देखील निश्चित केल्या जाणार आहेत. हा कुंभमेळा एक महिना भरणार असून त्यादरम्यान या विशालकाय मूर्तीचा अभिषेक विधी केला जाणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या सहकार्याने निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.
भगवान ऋषभदेव देवस्थानाची कार्यकारिणी मांगीतुंगी येथे कुंभमेळा घेण्यासाठी केव्हाही सज्ज आहे, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचे नियम काय असतील त्यावरच कुंभमेळा भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अन्यथा काही दिवस हा कुंभमेळा पुढे ढकलण्याबाबत देवस्थान निर्णय घेईल.
- संजय पापडीवाल, महामंत्री