निफाड तालुक्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:49 PM2021-05-08T23:49:38+5:302021-05-09T00:18:02+5:30
ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण जास्त असून, मृत्यूचे प्रमाण ३.१७ टक्क्याच्या जवळपास आहे. घटत्या रुग्णसंख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट कायम आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात शासन व प्रशासनाला यश मिळाले. सध्या कोरोना अधिक वेगाने पसरत आहे. दररोज कोरोना रुग्णांचे व मृत्यूचे आकडे भयभीत करणारे आहेत. त्यामुळे मनामनात भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे.
कोरोनाचे संकट अगदी जवळ आले असले तरी सजगता व निर्बंधांचे पालन केल्यास हे संकट अनेकपटींनी कमी करता येऊ शकते. सध्याच्या लाटेत कोरोना झालेले ८७.२ टक्के रुग्ण ठणठणीत होत आहेत.
७ मे २०२१ पर्यंत तालुक्यातील १६ हजार २३२ नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी १४ हजार १५४ नागरिक कोरोनाला हरवून आले आहे. १ हजार ५६४ जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत संकटाची व्याप्ती वाढली आहे. नागरिकांनी अजूनही सजगता व निर्बंधांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या या लाटेवरही मात होऊ शकते. वेळीच तपासणी व योग्य उपचार मिळाल्यास ज्येष्ठांनी कोरोनावर मात केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची चिंता करण्याऐवजी स्वतः व परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे.
नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूंत्रीचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करावी. पात्र, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. निफाड तालुक्यातील ८७.२ टक्के नागरिकांनी कोविडवर यशस्वी मात केली आहे. नागरिकांनी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
- डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, निफाड.