स्वयंशिस्तीनेच होईल कोरोनाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:07+5:302021-03-14T04:15:07+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील ...
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील गर्दी ही धोक्याची वर्दी मानली जात असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करणे जिल्हा प्रशासनाला भाग पडले असले तरी आता यापुढे लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वानीच स्वयंशिस्तीने आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशा भावना नाशिकमधील मान्यवर व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
नाशिकमध्ये बाधितांची संख्या वाढू लागल्याने सोमवार ते शुक्रवार दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी ७ वाजपेर्यंत सुरू ठेवण्याची मर्यादा असून शनिवार - रविवारी तर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा व्यापाऱ्यांच्या आणि बाजारपेठेतील अर्थकारणाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील फटका बसणार आहे. त्यामुळे कोरोना वाढू न देणे यासाठी सर्व प्रथमच सर्वांनीच शिस्त बाळगली पाहिजे, बाजारपेठा सुरू असल्यावरही स्वयंशिस्त पाळली पाहिजे तरच कोरोनाचा पराभव होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कोट-१
प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लादावे, दुकाने ही गर्दीची ठिकाणे नाही. दुकानांमध्ये गर्दी होत नाही. आणि आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक खबरदारीही घेतली जाते. दोन दिवसाच्या बंदला व्यावसायिकांनी सहकार्य केले. परंतु, गेल्या वर्षभराच्या कठीण परिस्थितीनंतर व्यवसाय रुळावर येत असताना यापुढे बंद हा पर्याय होऊ शकत नाही.
- गिरिश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन नाशिक
कोट- २
बाजारपेठेत शनिवारी, रविवारी दुकाने बंद राहिली तर महिन्याचा २५ टक्के व्यवसाय बंद राहणार आहे. अशाप्रकारे व्यवसायाच्याच दिवशी दुकाने बंद राहिली तर व्यावसायिकांना नोकरकपात अथवा वेतनकपात करावी लागली तर त्याचा अर्थचक्रावरही गंभीर परिणाम होईल.
-दिग्विजय कापडिया, अध्यक्ष, कापड विक्रेता महासंघ.
कोट- ३
निर्बंधात दुग्ध व्यवसायाला सवलत असली तरी बाजारपेेठेत बाहेरून येणारा ग्राहकच नसल्याने व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अर्थात, अशी निर्बंधाची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनीच आरोग्य नियमांचे पालन केले पाहिजे.
-किशोर कासलीवाल, डेअरी व्यावसायिक
कोट- ४
शेतमाल व भाजीपाला विक्रीचा व्यावसाय सुरू असला तरी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळच नाही, त्यामुळे ५० टक्केही व्यावसाय होत नसल्याने भांडवलही सुटत नाही. त्यामुळे वेळेचे निर्बंध कायम ठेवून बाजारपेठ सुरूच ठेवणे आवश्यक आहे.
- वैभव जाधव, भाजी विक्रेता
कोट-५
प्रवासी बस स्थानके व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी फारच कमी असते. ग्राहकच नसल्याने आधीच संकटाचा सामना करीत असलेल्या किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवले तर आणखीनच अडचणीत येतील.
-रामेश्वर जाजू, अध्यक्ष, रिटेल क्लॉथ असोसिएशन, नाशिकरोड विभाग.