coronavirus: नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा, शहरातील २५ तर ग्रामिणमध्ये ११ पोलिसांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:38 PM2021-03-15T22:38:53+5:302021-03-15T22:39:00+5:30
शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे.
नाशिक - शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील २५ तर ११ ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेले पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (36 cops hit in Nashik, 25 in urban areas and 11 in rural areas)
एकीकडे पुन्हा फैलावणारा कोरोनाचा प्रादूर्भाव तर दुसरीकडे कायदासुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत. पोलिसांच्या कामाचा ताण आता पुन्हा वाढताना दिसत आहे; मात्र अशास्थितीत कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे पोलिसांकरिता जिकरिचे ठरु लागले आहे. शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ पाहत असतानाच पोलिसांनाही या आजाराची बाधा होऊ लागली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस अधिकारी व ११ अंमलदार आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तेथे ११ पोलीस बाधित आढळून आले आहेत. बाधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा पुरेपुर वापरावर पुन्हा भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यांना ‘कोरोना ॲलर्ट’
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना ‘ॲलर्ट’ करत कोरोना आजाराला रोखण्यासाठी आपआपल्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सुचना वरिष्ठ स्तरावरुन करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर बंधनकारक करण्यात आला आहे.