coronavirus : मुदतबाह्य मिठाईची विक्री कराल तर खबरदार, एफडीएचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:46 PM2020-03-24T13:46:20+5:302020-03-24T13:47:23+5:30
मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.
नाशिक : करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य त्या उपाय योजना आखण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दि 22/3/2020 रोजी जनता कर्फ्यु व आज दि 24/3/2020 पासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु जसे ,दूध, किराणा ,भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यातआले आहेत.
मिठाई पदार्थ हे अत्यावश्यक व्यापारात मोडत नाहीत. त्यामुळे हा व्यवसायही बंद आहे. अशा मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई शिल्लक असू शकते. व्यापाऱ्यांकडून मिठाईची सर्वोत्तम दिनांकाची मुदत संमपल्यानंतर विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.
सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीहि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करतांना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. कृपया सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना पोहचेल अशा प्रकारे याचा प्रसार करण्यात यावा.
उद्या सर्वत्र गुडी पाडवा साजरा केला जात आहे.जनतेने बाहेरील मिठाई ऐवजी घरी तयार केलेली मिठाईचं सेवन करावी. - चंद्रशेखर साळुंके, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक