Coronavirus: हा जन्म ना पुरेसा, होऊ कसा उतराई…; नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:16 PM2020-04-21T19:16:19+5:302020-04-21T19:20:05+5:30
कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही.
नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण काल आजारातून बाहेर पडला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले; त्यावेळी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्याशी बातचीत करण्यात आली आहे. ‘कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही. खरं सांगायचं झालं तर मी आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेविका या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण यांनी माझ्यासाठी दिलेली सेवा ही कशातही मोजता येणार नाही. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबांसाठी ते रिअल हिरो ठरले आहेत. मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन…‘सांग आरोग्यदूता उपकार कसे मी फेडू…हा जन्म ना पुरेसा…उतराई कसा होऊ…’, अशा भावना नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णानं व्यक्त केल्या आहेत. सोमवारी २० एप्रिल रोजी हा रुग्ण बरा होऊन आपल्या घरी निघाला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधण्यात आला.
तुम्हाला कोरोनाची लागण कुठे आणि कधी झाली असावी, असे तुम्हाला वाटते?
व्यवसायानिमित्त मी २२ मार्चला दिल्ली येथे गेलो येतो. त्यावेळी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर मी साधारण २ तास थांबलो होतो. कदाचित तेथूनच मला कोरोनाची लागण झाली असावी, असा माझा अंदाज आहे. ४ एप्रिल रोजी पोलीस माझ्या घरी आले. त्यांनी मला सांगितले की, तुमच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीनुसार तुम्ही दिल्ली परतीचा प्रवास केला आहे. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात तपासणीसाठी यावे लागेल. त्यानंतर सारे तुम्हाला माहीतच आहे. माझ्या स्वॅबचा रिपोर्ट ६ तारखेला आला आणि मला कोरोना झाल्याचे समोर आलं. तेथून पुढे माझ्यावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. एक आमचं सुदैव, की माझ्या घरातील कोणालाच कोरोनाची लागण झालेली नव्हती. त्या सगळ्यांचे रिपोर्टदेखील निगेटिव्ह आले.
नाशिक सिव्हिलमध्ये उपचार घेत असतानाच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
सरकारी दवाखाना म्हटला की, आपली नकारात्मक मानसिकता असते. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालय या बाबतीत खूप वेगळे आहे. येथे उपचार घेत असतानाचे अनुभव अतिशय विलक्षण होते. एवढ्या आणीबाणीच्या प्रसंगी देखील आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता कुठलेही ऋणानुबंध नसताना अगदी आपल्या माणसांसारखीच सेवा देत होते. मी आणि माझ्यासह इतरही रुग्ण बरे व्हावेत म्हणून स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे डॉक्टर यांच्या श्रमाला शब्दात मांडता येणार नाही. परमेश्वरापेक्षा ते माझ्यासाठी कमी नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार, डॉ. प्रमोद गुंजाळ व डॉ. चेवले यांचे खास करून आभार मानावेसे वाटतात. त्यांनी माझ्यावर योग्यवेळी योग्य उपचार केले.
या काळात कुटुंबाने कशी साथ दिली?
माझ्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन झाले होते. संपर्कात तर नव्हतोच. पण तरीही सर्वांच्या मनात एक अनामिक भीती होती. कारण कोरोनाने संपूर्ण कुटुंबच वेठीस धरले होते. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले व जीव भांड्यात पडला. मात्र असे असतानाही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझा परिवार मुळीच खचला नाही. ते सगळे माझ्याशी अधूनमधून बोलत होते. धीर देत होते. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचा परिवार आणि माझा परिवार हेच या काळात माझ्या पाठीशी होते.
यापुढे कोरोनाशी कसा लढा देणार, काय काळजी घेणार?
डॉक्टरांनी दिलेले सर्व पथ्य पाळणार आहे. त्यांनी सांगितलेला डायट कायम ठेवणार आहे. कोरोना असो अथवा नसो स्वत:ची आणि समाजाची काळजी घेणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम असो अथवा मास्कचा वापर आदींबाबत मी दक्ष असणार आणि समाजालाही सांगणार आहे. कोरोनाबाबत, त्याच्या उपचारपद्धतीबाबत आणि एकूणच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या यंत्रणेबाबत मी यापुढे जनजागृती करणार आहे.
समाजाला काय संदेश देणार
समाजाला मी एवढेच सांगेन की, माझा आणि माझ्या आनंदाचे श्रेय संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले, तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्यावर उपचार करण्याबरोबरच मला मानसिकरीत्या देखील सक्षम केले. त्यामुळेच मी आज कोरोनासारखे युद्ध जिंकू शकलो आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांचे ऐकावे व पोलिसांना सहकार्य करावे. घरात राहा जीवनावश्यक गोष्टींपेक्षा जीवन खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या एका निष्काळजीपणामुळे तुम्ही अनेकांना धोका पोहोचवू शकतात. घरात राहा, सुरक्षित राहा.
(शब्दांकन : मोहिनी राणे-देसले, माहिती अधिकारी, नाशिक)