CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 01:03 PM2022-01-05T13:03:11+5:302022-01-05T13:04:32+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यात नाशिक शहरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. १ जानेवारीला ८८, २ जानेवारीला ७१, ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यात नाशिक शहरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. १ जानेवारीला ८८, २ जानेवारीला ७१, तर ३ जानेवारीस १५१ तर ४ जानेवारीस नाशिक शहरातच २७६ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहेत. सोमवारीच आयुक्त कैलास जाधव यांनी खाते प्रमुखांच्या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचा आढावा घेतला. त्यात काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगितले असून रूग्णालयांची सज्जता करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्सिजन प्लांटची चाचणी घेण्याचे देखील सांगितले आहे. याशिवाय महापालिकेचे ओमायक्रॉनचे रूग्ण आढळल्याने महाकवच ॲप देखील कार्यन्वीत केले असून त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील नागरिक तर कळतातच शिवाय विलगीकरणातील नागरिक अन्य कोठे गेल्यास अधिकाऱ्यांना त्याचा अलर्ट येतो, तेही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात आगामी काळात रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते हे गृहीत धरून शहरात आठ हजार खाटांची सज्जता करण्यात आली आहे. यात नाशिक महापालिकेचे रुग्णालय आणि कोविड सेंटर मिळून साडेतीन हजार खाटा असतील. तुर्तास नवीन बिटको रूग्णालय आणि डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील व्यवस्था सज्ज असून गरजेनुसार कोविड सेंटर्स सुरू करण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांनी एकही डोस घेतला नाही आणि जे व्याधीग्रस्त आहेत, अशांना कोरोनाचा धोका अधिक आहे. नाशिक शहरात १३ लाख ६३ हजार नागरिकांपैकी १२ लाख ६४ हजार नागरिकांनी पहिला डाेस घेतला आहे. एकही मात्रा न घेणाऱ्या १ लाख नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे, असेही डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.