CoronaVirus News : कोरोना वाढला, पण रेमडेसिविरचे नो टेन्शन! 'या' जिल्ह्यात १३५ रुग्ण ऑक्सिजनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:40 PM2022-01-17T12:40:23+5:302022-01-17T12:50:43+5:30
नाशिक : तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढीची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षाही खूप अधिक आहे. मात्र, बहुतांश कोरोना रुग्ण घरीच उपचार करुन ...
नाशिक : तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढीची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षाही खूप अधिक आहे. मात्र, बहुतांश कोरोना रुग्ण घरीच उपचार करुन बरे होत असून, जे बाधित रुग्णालयात दाखल होत आहेत, त्यांच्या बाधेची तीव्रतादेखील अधिक नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्पष्ट धोरणानुसार त्यांच्यावर रेमडेसिविर वापरण्याची वेळच येत नसल्याने रेमडेसिविर आणण्यासाठीची धावाधाव, अनुपलब्धता, कुठून आणावे त्याची चिंता यासारखे कोणतेच टेेन्शन घेऊन धावपळ करण्याची वेळ निदान बाधितांच्या कुटुंबीयांना करावी लागत नाही.
सहा इंजेक्शनच काय, एकही नको
कोरोना झाल्याने ॲडमिट असलेल्या बहुतांश रुग्णांना गतवर्षी प्रत्येकी किमान पाच ते सहा इंजेक्शन्सचे डोस दिले जात होते. एकेका इंजेक्शनसाठी हजारो रुपये देऊन ब्लॅकमधून आणण्याची वेळ हजारो कुटुंबीयांवर आली होती. त्या तुलनेत आता कुटुंबातील कोणी सदस्य जरी रुग्णालयात दाखल असला तरी त्याला सहाच काय एकही रेमडेसिविर न लागतादेखील तो बरा होऊन परतत आहे.
१३५ रुग्ण ऑक्सिजनवर
जिल्ह्यात सध्या दहा हजारहून अधिक कोरोना रुग्ण बाधित असले तरी त्यातील लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या केवळ ८१७ असून त्यातही ऑक्सिजन लागलेले रुग्ण १३५ तर व्हेंटिलेटरवर ३७ रुग्णांचा समावेश आहे. तरीदेखील जिल्ह्यात कोणत्याही रुग्णाला रेमडेसिविरची गरज भासली नव्हती.
नाही लागत रेमडेसिविर
रेमडेसिविरचे काही गंभीर साईड इफेक्ट दिसून आल्यानंतर केवळ गंभीर किंवा अतिगंभीर रुग्णांनाच रेमडेसिविर वापरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे बहुतांश शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्येही रेमडेसिविरचा वापर बंदच करण्यात आला आहे. तसेच रुग्ण किंवा रुग्णाचे कुटुंबीयदेखील त्या औषधाचा वापर करण्याचा आग्रह धरत नाहीत.