CoronaVirus : दिल्लीच्या 'त्या' मरकजचे नाशिक कनेक्शन, संभाव्य कोरोनाबाधित प्रशासनाच्या निगराणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 02:32 PM2020-04-01T14:32:18+5:302020-04-01T15:39:16+5:30
CoronaVirus : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलीग जमातीच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक सोहळ्यात तब्बल 2 हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक: दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या एका सोहळ्याचे नाशिक कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल 21 व्यक्तींची अद्याप प्रशासनाने खात्री पटविली आहे. शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाची चार पथके पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवीत असून संध्याकाळपर्यंत निश्चित आकडा समोर येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात तब्बल 2 हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे बोलले जात आहे. यामधील काही लोक करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला संपूर्ण देशातून लोक गेले होते, यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बहुसंख्य लोक यामध्ये सहभागी झाले असून आता कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे 50 लोक या सोहळ्याला गेले असावे, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यापैकी 21 लोक आरोग्य विभाग व पोलिसांनी शोधून काढले आहेत, त्यांना विलगिकरण केले जात आहे. काहींना घरांमध्ये तर काहींना आरोग्य विभागाच्या कक्षात वेगळे ठेवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही पथके नाशिक शहरासह ग्रामीण भागात अशा लोकांचा शोध घेत आहेत. नाशिक शहरातील काही ठराविक उपनगरीय भागात तसेच मालेगाव, निफाड, चांदवड, नांदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये शोध घेतला जात आहे.