चिंताजनक! 'या' जिल्ह्यात लोकसंख्येच्या ५.५ टक्के नागरिकांना होऊन गेला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:40 PM2022-01-11T15:40:08+5:302022-01-11T15:46:35+5:30
नाशिक - जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४ लाख १८ हजार ७९७ नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची ...
नाशिक - जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४ लाख १८ हजार ७९७ नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची मिळून संख्या सुमारे ७० ते ७२ लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे एकूण आकडेवारीचा विचार करता, हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५.५ टक्के असून, ९४ टक्के नागरिक अद्यापही कोरोनामुक्त राहिले आहेत.
ऑक्सिजन मागणीतील वाढीपर्यंत निर्बंध कमीच
जिल्ह्यात बाधितांचा आकडा नियमित वाढत असला तरी बळींचे प्रमाण अत्यल्प असल्याने निर्बंधांबाबत काहीशी शिथिलता ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच अद्यापही कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन किंवा विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेले नाही. तसेच जोपर्यंत ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ होत नाही किंवा जोपर्यंत मृत्यूदरात मोठी वाढ होणार नाही, तोपर्यंत याबाबतचा निर्णय घेतला जाणार नाही.
कोरोना होऊन गेलेल्यांना धोका कमी
ज्या व्यक्ती कोरोना बाधित होऊन गेल्या आहेत, त्यांच्या शरीरात कोरोना विरोधी ॲन्टीबॉडीज आधीच तयार झाल्या आहेत. तसेच दोन लसींमुळे प्रतिकारशक्तीत वाढच झाली आहे. त्यातूनही कोरोना होऊन गेलेल्यांना कोरोना झाला तरी बहुतांश वेळा तो घरीच उपचार करून बरा होतो. त्यामुळे ज्या ५.५ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला, त्यांच्या निदान जिवाचा धोका तरी कमी झाला असल्याचे मानले जाते.
२६ लाखांहून अधिक नागरिक चाचणीत निगेटिव्ह
जिल्ह्यात परिचित, कुटुंबीय बाधित झाले म्हणून किंवा कुणा बाधिताच्या संपर्कात आला म्हणून किंवा सर्दी, तापासारखे आजार पण आले म्हणून भीतीपोटी चाचणी करून घेतलेले, तसेच रँडम चाचणी झालेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत तब्बल २६ लाख ४३ हजार १९७ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रातील १५ लाख ८० हजार ९७४ तर नाशिक ग्रामीण पैकी ९ लाख ४७ हजार ३५७ आणि मालेगावातील ९२ हजार ३९६ नागरिकांची तसेच जिल्हाबाह्य २२४७० नागरिकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ३० टक्क्यांच्या आसपास आहे.