CoronaVirus News : कोरोनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान; स्मार्टफोनसह नेटवर्कचाही प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:28 AM2022-02-04T10:28:17+5:302022-02-04T10:41:35+5:30
येवला (योगेंद्र वाघ) : कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा कधी बंद तर कधी सुरू राहिल्या. नाही म्हणायला काही उपक्रमशील ...
येवला (योगेंद्र वाघ) : कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा कधी बंद तर कधी सुरू राहिल्या. नाही म्हणायला काही उपक्रमशील शाळा व शिक्षकांनी शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत ज्ञानदानाचे काम केले. मात्र, त्यालाही तांत्रिक मर्यादा आल्या परिणामी विद्यार्थ्यांचे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना पुढे आली. खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांसह जिल्हा परिषद शाळांनीही ऑनलाइन शिक्षण सुरू केले. यासाठी सोशल माध्यमांचा वापर सुरू केला; परंतु ग्रामीण भागात भ्रमणध्वनीसह नेटवर्क रेंजचा प्रश्न निर्माण झाला. काही शिक्षकांनी गावात जावून चावडीशाळेचा, वस्तीशाळेचा प्रयोग राबविला. त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट, तिसरी लाट आली. यात शाळा बंद व सुरू असा लपंडाव सुरू झाला. यात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांचीच गैरसोय झाली.
येवला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २३६ शाळा असून इतर खाजगी संस्थांच्या ९८ अशा एकूण ३३४ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ७६९ तर इतर १०९६ असे एकूण १८६५ शिक्षक आहेत. तर जिल्हा परिषदेचे १६ हजार ९८७ आणि इतर खाजगी शाळांतील ४१ हजार ३३७ असे एकूण ५८ हजार ३२४ विद्यार्थीसंख्या आहे. १३ जानेवारीपासून पहिलीच्या वर्गापासूनच्या शाळा सुरू झाल्या. २४ जानेवारीपासून सर्वच शाळा सुरू करण्याचा शासननिर्णय झाला. सद्य:स्थितीत सर्वच खाजगी शाळांसह जिल्हा परिषदेच्या ९६ शाळा सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या ७२ शाळा दोन सत्रांत तर २४ शाळा एका सत्रात सुरू आहे. या शाळाही अवघ्या तीन तास सुरू आहे. तालुक्यातील भायखेडा येथील जिल्हा परिषदेची वस्तीशाळा व भारम केंद्रातील जिल्हा परिषदेची विठ्ठलवाडी वस्तीशाळा शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने बंद आहेत.