CoronaVirus News : ...म्हणून कोरोना झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही टाळावा लागतोय बूस्टर डोस!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:46 PM2022-02-08T14:46:23+5:302022-02-08T14:53:36+5:30
नाशिक - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर अर्थात प्रिकाॅशन डोस देण्यास एक महिन्याचा कालावधी उलटून ...
नाशिक - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर अर्थात प्रिकाॅशन डोस देण्यास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यात अद्यापही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस घेऊन ९ महिने झालेले नाहीत. तर काही आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस घेऊनदेखील तिसऱ्या लाटेत गत महिन्यातच कोरोना होऊन गेल्याने त्यांनादेखील प्रिकॉशन डोस सध्या तरी टाळावा लागला आहे.
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉन संसर्गाचे वाढते रुग्ण यामुळे ६० वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना व सहव्याधी म्हणजेच कोमॉर्बिड रुग्णांना बूस्टर डोस देण्यास प्रारंभ होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. बूस्टर डोसला वेग देण्याची प्रशासनाची इच्छा असली तरी दोन्ही डोस घेतलेल्या अनेकांना गत दोन महिन्यांत कोरोना होऊन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे डोसबाबतच्या नियमानुसारच तीन महिने डोस घेता येणार नसल्याने अशा शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचे डोस प्रलंबित राहिले आहेत.
कोव्हॅक्सिन उपलब्धतेस एक-दोन दिवस विलंब
जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या कोविशिल्डच्या साठ्यात कोणतीही उणीव नाही. मात्र, कोव्हॅक्सिन डोसच्या पुरवठ्यात कधी एक-दोन दिवस विलंब झाला, तरच कुणाचा तरी डोस एक-दोन दिवस विलंबाने होत आहे. मुळात कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्यांची संख्या एकुणातच कमी असून शहरात केवळ चारच केंद्रांवर ते दिले जात आहेत. त्यामुळे लसींअभावी कुणाचे डोस प्रदीर्घ काळ रखडल्याची उदाहरणे नाहीत.
कोरोनानंतर तीन महिन्यांनंतरच प्रिकॉशन डोस
एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची लागण झाल्यास त्यानंतर किती महिन्यांनी लसीचा दुसरा वा ‘प्रिकॉशन डोस’ घेता येईल, त्याबाबत अनेकांना अद्यापही संभ्रम आहे. मात्र, त्याबाबत केंद्राने स्पष्ट निर्देश दिले असून तीन महिन्यांनंतर असा डोस घेता येणार आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने आढावा घेऊनच हा निर्णय दिलेला आहे.
ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेले नाहीत, त्यांना प्रिकॉशन डोस घेण्याची परवानगीच नाही. त्यामुळे अशा प्रकारातील काही ज्येष्ठ नागरिक केंद्रांवर आले असल्यासच त्यांना केंद्रांवरून डोस नाकारला जातो.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका