CoronaVirus News : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाहता मुलांना शाळेत पाठवायचं का?; पालकांमध्ये संभ्रम, डॉक्टर्स म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:51 PM2022-01-25T14:51:45+5:302022-01-25T15:15:36+5:30
नाशिक - जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार (दि. २४) पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी ...
नाशिक - जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार (दि. २४) पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट बघता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही? याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यात रोज अडीच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहेत, अशा परिस्थितीत शाळा सुरू झाल्या आहेत. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असले तरी पंधरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला अद्याप सुरुवातही नाही. मागील दोन वर्षांपासून तीन ते चार वेळा शाळा सुरू होऊन बंद झाल्या. त्यामुळे यावेळी पालक वेट ॲड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहेत.
पहिली ते बारावी सुरू
दिवाळीच्या सुटीनंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरातील शहरातील सर्वच शाळा उघडल्या होत्या. मात्र, डिसेंबरअखेरपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याने राज्य शासनाने बंद करण्याचा निर्णय झाला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याने सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत.
ऑनलाईनचा आधार
दोन वर्षांत शाळा तीन ते चार वेळा सुरू होऊन बंद झाल्या. आठ-पंधरा दिवस किंवा महिनाभरानंतर रुग्णसंख्या वाढली की शाळा बंद करण्यात येतात. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचाच आधार घ्यावा लागत आहे.
ग्रामीण भागात शाळा सुरू
जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरूच होत्या. तसेच शासनाच्या निर्णयानंतर सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या संख्येत भर पडली.
डॉक्टर्स म्हणतात?
ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज पडत नसली तरी प्रसाराचा वेग मात्र अधिक आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये भीती असणे साहजिक आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करून मुलांना शाळेत पाठविण्यास हरकत नाही. लक्षणे असलेल्या बालकांची काळजी घ्यावी, त्यांना शाळेत पाठवू नये. १५ ते १८ वर्षे गटातील मुलांचे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. दीपा जोशी, बालरोगतज्ज्ञ