CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! 'या' जिल्ह्याचा वाढता पॉझिटिव्हीटी रेट ठरतोय चिंतेचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 05:32 PM2022-01-16T17:32:40+5:302022-01-16T17:44:04+5:30
नाशिक : आठवडाभरापूर्वी पहिल्यांदाच २० टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट एक दिवस वगळता सातत्याने २० टक्क्यांहून अधिक राहिला ...
नाशिक : आठवडाभरापूर्वी पहिल्यांदाच २० टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट एक दिवस वगळता सातत्याने २० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. त्यातही शुक्रवारी तर पॉझिटिव्हीटी दर थेट ३९ टक्क्यांवर तर शनिवारी थेट त्याहून वर पोहोचला असून हा वाढता पॉझिटिव्हीटी रेट जिल्ह्याच्या चिंतेचे कारण ठरत आहे.
१ टक्क्याहून कमी ते ३ टक्के
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर हा डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत १ टक्क्यापेक्षाही कमी झाला होता. म्हणजे १०० माणसांचे नमुने तपासले असता त्यातून अवघे १ किंवा २ रुग्ण बाधित आढळून येत होते. डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात हा पॉझिटीव्हीटी दर १ टक्क्यांहून अधिक वाढून दीड टक्क्यांपर्यंत पोहोचला. तर ३० डिसेंबरला हा पॉझिटीव्हीटी दर २ टक्क्यांहून अधिकच्या म्हणजे २.१७ टक्के असा झाला. तर ३१ डिसेंबर अर्थात वर्षअखेरीस हा पॉझिटीव्हीटी दर ३.१० टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच नवीन वर्षाच्या प्रारंभापासून हा पॉझिटीव्हीटी दर खऱ्या अर्थाने वेग पकडू लागला .
वर्षारंभापासून भयावह वेग
१ जानेवारीला ३.५७ टक्के असलेला दर ३ जानेवारीला ६.७७ टक्के सुमारे दुपटीच्या वेगाने वाढल्याचे दिसून येते. त्यानंतर एकाच दिवसात अर्थात ४ जानेवारीला पॉझिटिव्हीटी दर १०.४९ टक्के तर ६ जानेवारीला ११.०८ टक्क्यांवर पोहोचला. तर ७ जानेवारीला हा दर १३.८३ टक्क्यांवर पोहोचला होता. १० जानेवारीला १७.६४ टक्के तर ११ जानेवारीला हा दर प्रथमच वीस टक्क्यांवर अर्थात २२.१७ टक्क्यांवर तर १२ जानेवारीला हा पॉझिटिव्हीटी दर थेट २९.२० टक्क्यांवर चढला. १३ जानेवारीला हा दर काहीसा कमी होऊन २५.९९ टक्क्यांवर आला. तर १४ जानेवारीला तो थेट ३९.०५ टक्क्यांवर गेला.
मृत्युदरात वाढ नाही हाच दिलासा
जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट दिवसागणिक तुफान वेगाने वाढत असूनही गत पंधरवड्यात बहुतांश वेळा शून्य बळी तर अनेकदा एक किंवा फारतर दोन बळी याहून अधिक बळींची नोंद झालेली नाही. रुग्णसंख्या वाढत असतानाही बळीसंख्या शून्य असणे हाच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा आहे. मात्र, मृत्युदरात कधीही वाढ होऊ नये, यासाठी तरी यंत्रणेला दक्ष रहावे लागणार आहे.