CoronaVirus News : मोठा दिलासा! 'या' जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट ४८ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:48 AM2022-02-17T11:48:55+5:302022-02-17T11:58:32+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये गत पंधरवड्यात वेगाने घडामोडी घडल्या असून, महिन्याच्या प्रारंभी ४८ टक्क्यांवर पोहोचलेला पॉझिटिव्हिटी रेट फेब्रुवारी ...
नाशिक : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये गत पंधरवड्यात वेगाने घडामोडी घडल्या असून, महिन्याच्या प्रारंभी ४८ टक्क्यांवर पोहोचलेला पॉझिटिव्हिटी रेट फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात अवघ्या ३ टक्क्यांपेक्षा कमी अर्थात २.९५ म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या पर्वापर्यंत घटला आहे. डिसेंबरअखेरचे दोन दिवस आणि जानेवारीच्या प्रारंभापासूनच हे प्रमाण वाढण्यास प्रारंभ झाला होता. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात होणारी वाढ आणि चाचणीच्या तुलनेत घटणारे बाधितांचे प्रमाण या सर्व बाबी पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्यास पूरक ठरत आहेत.
जानेवारीत पोहोचला ४८ टक्क्यांपर्यंत
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट जानेवारी महिन्याच्या प्रारंभी अवघा ३ टक्क्यांहून अधिक होता. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस पहिल्यांदाच हा रेट २० टक्क्यांवर गेला; त्यानंतर तर हा दर सातत्याने ४० ते ४८ टक्क्यांमध्ये राहत होता. म्हणजेच दोन माणसांची चाचणी केल्यास त्यातील एक हमखास बाधित आढळून येत होता. मात्र, हाच दर आता ३ टक्क्यांखाली म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वीच्या पातळीपर्यंत घसरल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
डिसेंबरअखेरीस वाढीपासून प्रारंभ
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दर हा डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत एक टक्क्यापेक्षाही कमी झाला होता. म्हणजे १०० माणसांचे नमुने तपासले असता त्यातून अवघा एक रुग्ण बाधित आढळून येत होता. डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात हा दर १ टक्क्याहून अधिक वाढून दीड टक्क्यापर्यंत पोहोचला, तर ३० डिसेंबरला तो २ टक्क्यांहून अधिकच्या म्हणजे २.१७ टक्के असा झाला. ३१ डिसेंबर अर्थात वर्षअखेरीस हा पॉझिटिव्हिटी दर ३.१० टक्क्यांवर पोहोचला.
जानेवारीअखेरीस सर्वोच्च पातळीवर
४ जानेवारीला पॉझिटिव्हिटी दर १०.४९ टक्के, तर तर १४ जानेवारीला तो थेट ३९.०५ टक्क्यांवर आणि १५ जानेवारीला ४५ टक्क्यांवर पोहोचला होता. तेव्हापासून तो सातत्याने ३५ ते ४५ टक्क्यांवरच राहू लागल्यानंतर २८ जानेवारीला थेट ४८.७६ टक्क्यांवर पोहोचल्याने चिंतेचे सावट गडद झाले होते. मात्र, त्यानंतरच्या आठवड्यापासून अर्थात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच त्यात वेगाने घट आली.
उपचारार्थीदेखील हजारखाली
जिल्ह्यातील बाधितांच्या तुलनेत कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्येतही सातत्याने मोठी घट आल्याने एकूण उपचारार्थी संख्यादेखील एक हजारच्या पातळीवर आली आहे. विशेष म्हणजे त्यातही रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तर पन्नासपेक्षाही कमी असल्याने महिनाअखेरीसच कोरोना पूर्णपणे जाण्याची चिन्हे आहेत.