CoronaVirus : नाशिक विभागातील अभयारण्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत 'नो एन्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:06 PM2020-03-31T14:06:00+5:302020-03-31T14:19:39+5:30
coronavirus : शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक : राज्यातील करोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दक्षता म्हणून राखीव वनक्षेत्र व अभयारण्याचे दरवाजे पर्यटक व अभ्यासकांसाठी बंद करण्यात आले आहेत. नाशिक वन्यजीव विभागाने करोनामुळे निफाड तालुक्यातील प्रसिध्द नांदूरमध्यमेश्वर, धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम, जळगावमधील यावल, अहमदनगर मधील कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात जाता येणार नाही. या भागात सातत्याने गस्त घालण्याचे आदेश वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिले आहेत.
कळसुबाई हरिशचंद्रगड येथे पर्यटन बंदीचे आदेश 16 मार्च रोजी दिल्यानंतर हे आदेश आता 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. नाशिक परिक्षेत्रातील नाशिकसह अहमदनगर, यावल आणि धुळे वनक्षेत्रात पर्यटन बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सुटीच्या दिवशी वनक्षेत्रात पर्यटनासाठी तसेच ट्रेकिंगकरीता जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. करोनाचे सावट पर्यटनावर जाणवत असले, तरीही राखीव वनक्षेत्रात भटकंती करण्यासाठी अनेकजण येत असल्याचे निरीक्षण वनधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. यानुसार वन्यजीव विभागाने नाशिक परिक्षेत्रातील संपूर्ण वनक्षेत्रात पर्यटकांसह अभ्यासकांना जाण्यास मज्जाव केला आहे.
शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे वनक्षेत्रात पर्यटनास बंदी केली असून, या क्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे. तसेच पर्यटकांना वनक्षेत्रात न जाण्याचे आवाहन करावे. आदेशाचे उल्लंघन करुन वनक्षेत्रात जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे अंजनकरांनी सांगितले.