CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी बंदिजनांचा पुढाकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लाखोंची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:11 PM2020-03-31T12:11:32+5:302020-03-31T12:33:12+5:30
coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान नेहमीच आपल्या विविध उपक्रमांनी चर्चेत असतात. या बंदिजनांची आकर्षक कलाकुसर लक्षवेधी ठरते. सध्या देशावर कोरोनाचे सावट असून टेलरिंग काम करणाऱ्या कैद्यांनी मास्क बनविण्याचे काम हाती घेतलेच आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जवळपास २ लाख ७८ हजारांची रक्कम देऊ केली आहे. नुकताच कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.
नाशिकरोड कारागृहातील बंदिजनांनी घालून दिलेला आदर्श प्रेरणादायी असल्याचे मांढरे म्हणाले. कारागृहातील पक्क्या कैद्यांना कायद्यानुसार काम करावे लागते. कारागृहात जवळपास दहा कारखाने असून याठिकाणी हे बंदिवान काम करतात. सुतारकाम, लोहारकाम, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी आदी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो. तो कारागृह प्रशासनाकडे सुरक्षित ठेवला जातो. शिक्षा संपल्यावर किंवा कैद्यांच्या गरजेनुसार हा पगार कैद्यांना दिला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला कैद्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला व आपल्या पगारातील शंभरापासून हजारापर्यंतची रक्कम सरकारला देण्याचे ठरवले. त्यानुसार २ लाख ७८ हजाराचा निधी जिल्हाधिकान्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याआधीही केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखांच्या वर निधी दिला जमविण्यात आला होता. हा निधी जवळपास कारागृहात असलेल्या तीन हजार पेक्षा अधिक कैद्यांनी दिला.