मालेगावी ‘कोरोना’वर मनपाचा सव्वादोन कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:32 PM2020-07-10T21:32:13+5:302020-07-11T00:16:27+5:30
मालेगाव : (शफीक शेख )महाराष्टÑात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने प्रारंभी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगावातील रुग्णही मोठ्या संख्येने बरे होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असून, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. मालेगावात यंत्रमाग मजुरांकडून कोणताही खर्च न घेता मोफत उपचार करून त्यांना घरी पाठवले जात असल्याने ‘मालेगाव पॅटर्न’चीच चर्चा होत आहे.
मालेगाव : (शफीक शेख )महाराष्टÑात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने प्रारंभी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगावातील रुग्णही मोठ्या संख्येने बरे होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असून, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. मालेगावात यंत्रमाग मजुरांकडून कोणताही खर्च न घेता मोफत उपचार करून त्यांना घरी पाठवले जात असल्याने ‘मालेगाव पॅटर्न’चीच चर्चा होत आहे. मालेगाव महापालिकेला राज्य शासनातर्फे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केवळ २० लाख रुपये देण्यात आले, मात्र महापालिकेने आतापर्यंत २ कोटी २१ लाख रुपये खर्च केले आहेत.
शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. यंत्रमाग सुरू झाल्याने कामगारांच्या हातांना काम मिळाले. त्यामुळे बाजारपेठेत काही प्रमाणात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. शहरात वृत्तपत्र वितरणही सुरू झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग असाच सुरू राहिल्यास काही दिवसातच मालेगाव कोरोनामुक्त होण्याची आशा बळावली आहे. प्रारंभी डॉक्टरांसह नागरिकांत घबराट असल्याने रुग्ण उपचारासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली; मात्र आता कोरोना बरा होतो असे लक्षात आल्यावर लोक उपचारासाठी पुढे येऊ लागले आहेत. शहरात नागरिकांना ६८ हजार ३१८ एन-९५ मास्क वाटण्यात आले असून, १५ हजार ९१० पीपीई किट वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. रुग्णांकरिता १४ व्हेण्टिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे यांनी सांगितले.
मालेगावात आतापर्यंत १ हजार ४३ कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण तपासण्यात आले. आतापर्यंत २८ जून रोजी सर्वाधिक ७६ रुग्ण उपचार घेत होते, तर सर्वात कमी ४५ बाधित २१ जून रोजी उपचारासाठी दाखल होते. मालेगावी कोरोना नियंत्रणात असला तरी रुग्ण मिळून येतच असल्याने प्रशासनासमोर चिंता आहे.
मालेगावी कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात रुग्ण तपासणीचा वेग कमी होता. परंतु, कोरोनाचे वाढत जाणारे गांभीर्य लक्षात घेता शासन हलले आणि विविध स्तरावर उपाययोजनांवर भर दिला गेला. घरोघरी सर्वेक्षण राबविण्यास सुरुवात झाली. त्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेसमोर होते. महापालिकेनेही कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपायांवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
------------------
५२ हजार व्यक्ती अति जोखमीच्या
शहरातील १ लाख २४ हजार २८८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ५२ हजार ३०१ व्यक्ती (हायरिस्क) जोखमीच्या मिळून आल्या. ५० वर्षांपर्यंतचे ५७ हजार ९३२ व्यक्ती होत्या. हृदयविकाराच्या तक्रारी असलेले रुग्ण ११३ व्यक्ती मिळून आल्या. ४० जण कॅन्सरचे रुग्ण आहेत. किडनी विकाराचे ६३ रुग्ण मिळून आले तर इतर आजारांचे १ हजार ११० रुग्ण मिळून आल्याची माहिती मालेगाव मनपाचे आयुक्त दीपक कासार यांनी दिली.
------------------
८४ कंटेन्मेंट झोन : रुग्णांना सात्विक आहार
शहरात एकूण १८५ पैकी ८४ अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन करण्यात आले. ३४३ टीम कार्यरत असून, त्यात ६८६ जण कोरोना विरोधात काम करीत आहेत. रुग्णांना अंडी, दूध, उपमा, पोहे, इडली यांचे वाटप करण्यात आले.
--------------
५०० बेडला सेंट्रल आॅक्सिजन लाइन
राज्यात फक्त मालेगावात ५०० बेडला सेंट्रल आॅक्सिजन लाइनची व्यवस्था आहे. महाराष्टÑात अशी सेंट्रल बेड लाइनची व्यवस्था इतरत्र कुठेही नाही. आतापर्यंत ८७१ रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप गेले असून, ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मालेगावी मृत्युदर कमी आहे.