मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:55 PM2020-05-15T23:55:01+5:302020-05-15T23:55:53+5:30
महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे.
नाशिक शहरात दर पावसाळ्यात धोकादायक घरांचा प्रश्न उभा राहातो. पावसाळ्यात नाशिक आणि पंचवटी गावठाणातील जुने वाडे भिजतात आणि त्यानंतर काही वाड्यांचा भाग कोसळतो तर काही वेळा संपूर्ण वाडेच खाली येतात. गेल्या वर्षी सुमारे पंचवीस ते तीस वाडे पडले होते आणि त्यात दोन जणांचे बळी गेले होते तर एक दोन ठिकाणी वाडे पडल्याने संबंधित वाड्यातील नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने संबंधितांना घरे रिकामी करून अन्यत्र स्थलांतरासाठी नोटिसा बजावून पोलिसांचीदेखील मदत घेतली होती. घर मालक आणि भाडे करू वादात अनेक धोकादायक वाड्यांचा पुनर्विकास होऊ शकला नाही. याठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याची तयारी असली तरी अद्याप ती प्रशासकीय लालफितीत आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी यंदा लॉकडाउनमुळे महापालिकेचा मूल्यमापन अहवाल रखडला आहे. यासंदर्भात, गेल्या आठवड्यात लोकमतने ‘क्लस्टर वाºयावर, वाडे पडण्यावर’ हे वृत्त देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान आता प्रशासनाने धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे आढळून आले आहेत. त्यातील निम्या मिळकती अती धोकादायक आहेत. या सर्वांना नोटिसा बजावण्यासाठी नगररचना विभागाने ७०८ नोटिसा तयार करून विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविल्या असून, त्या संबंधितांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. तथापि, यानंतरदेखील नागरिक स्थलांतरित होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
काझी गडीवर ११४ धोकादायक घरे
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार ७२३ धोकादायक घरे आहेत यात नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक २६०, नाशिक पश्चिम मध्ये १९२, पंचवटीत १७५, सिडको विभागात १९, नाशिकरोड विभागात साठ आणि सातपूर विभागातील सतरा घरांचा समावेश आहे. यात पूर्व विभागातील सर्वाधिक २६० घरांमध्ये काझी गढीवरील ११४ धोकादायक घरांचा समावेश आहे.